पुणे – केंद्र सरकारच्या शिक्षण व कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन व भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या वतीने फुटबॉल खेळाची संस्कृती रुजविण्याच्या दृष्टीने फिफाच्या “फुटबॉल फॉर स्कूल’ या उपक्रमांतर्गत “ट्रेन द ट्रेनर’ हे दोन दिवसीय शिबिर शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे संपन्न झाले.
यावेळी शिक्षण मंत्रालयाचे उपसचिव चरणजीत तनेजा, केव्हीएस मुंबई विभागाचे उपायुक्त सोना सेठ, एनव्हीएस पुणे विभागाचे उपायुक्त बी. व्यंकटेश्वरन, फिफा प्रशिक्षक शिक्षकअल्बर्टो जेकोमिनी, मेल्विन मेंडी, फुटबॉल फॉर स्कूल उपक्रमाचे समन्वयक व एआयएफएफ कार्यकारी समिती सदस्य मालोजीराजे छत्रपती, एआयएफएफ सदस्य सचिव मुलराजसिंह चुडासमा, शिवछत्रपती क्रीडा संकुलाचे उपसंचालक सुहास पाटील, एसी मुंबई विभागाचे सुमित मेहरा आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या एकूण सर्वांगीण विकासात इतर खेळांप्रमाणेच फुटबॉललाही तितकेच महत्त्व देणे गरजेचे आहे. फुटबॉलला शालेय पातळीपासूनच प्रोत्साहन देण्यासाठी व त्यातून सकारात्मक परिणाम घडवून आणण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे, असे मत उपायुक्त सोना सेठ यांनी व्यक्त केले. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून फुटबॉल क्रीडा प्रकाराला चालना देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असल्याचे चरणजीत तनेजा यांनी सांगितले. मालोजीराजे छत्रपती व सोना सेठ यांच्या हस्ते सहभागार्थींना प्रशिक्षण प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
फुटबॉल क्रीडा प्रकारच्या वृद्धीसाठी प्रयत्नशील राहण्याच्या दृष्टीने शुभेच्छा दिल्या. ट्रेन द ट्रेनर कार्यक्रम विविध शैक्षणिक संस्थांशी संलग्न प्रशिक्षक शिक्षकांना सक्षम करण्यासाठी तसेच त्यांचे प्रशिक्षण कौशल्य वाढीस लागण्यासाठी तसेच देशभरातील शाळांमध्ये प्रभावीपणे फुटबॉल शिकवता यावे यासाठी राबवण्यात आला. प्राचार्य अविजित पांडा यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सहभागार्थींना उपक्रमा मागाची उद्दिष्टे व उद्देश मुलराजसिंह यांनी मार्गदर्शनाद्वारे स्पष्ट केले.