पुणे – शहरातील उपनगरांमध्ये रूफटॉप तसेच निवासी इमारतींच्या वापरात बदल करून सुरू करण्यात आलेल्या हॉटेलवर महापालिकेने कारवाई करण्याचे साकडे पोलिसांकडून महापालिकेस घालण्यात आले. त्याला, प्रतिसाद म्हणून पालिकेनेही अशा ठिकाणांचा शोध घेऊन कारवाई केली.
मात्र, त्यानंतर, पुन्हा, पुन्हा ही हॉटेल सुरू होत असल्याने महापालिका अधिनियमातील तरतुदीचा वापर करत पालिकेने अशा हॉटेलवर गुन्हे दाखल करण्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल केल्या असून आता मात्र पोलिसांकडून या तक्रारींना कोणताही प्रतिसाद न देता गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे, पोलिसांच्या या दुट्टपी कारभारावर महापालिका प्रशासनही हतबल झाले असून याबाबत तक्रार कोणाला करायची, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या हॉटेलबाबत कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पोलिस आयुक्त, उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त, अन्न व औषध प्रशासन आयुक्त यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार गुरुवारी ही बैठक होणार होती, परंतु ती पुढे ढकलण्यात आली आहे.
नेमका प्रकार काय
शहरात उपनगरांमध्ये अनेक भागात बंदी असतानाही इमारतींच्या टेरेसवर बांधकाम करून हॉटेल सुरू करण्यात आली आहेत. या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत डीजे तसेच गोंधळ असल्याने नागरिकांच्या तक्रारी आहेत. परिणामी, पोलिसांनी महापालिकेस पत्र दिले. तसेच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कारवाई करण्याची मागणी केली. त्यानुसार, महापालिका आयुक्तांनीही प्रशासनाला आदेश देत, अशी हॉटेल शोधून बांधकाम निर्मूलनाची कारवाई करण्याचे आदेश दिले.
बांधकाम विभागाने साईड मार्जिन, टेरेस आदी ठिकाणी अनधिकृत बांधकाम करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांना नोटीस पाठविल्या आहेत. तसेच काही हॉटेलवर कारवाई करण्यास सुरुवात केली. मात्र,व्यावसायिक पुन्हा पुन्हा हॉटेल सुरू करत असल्याने महापालिकेने अशा व्यावसायिकांविरुद्ध महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियमातील कलम 43 सह कलम 52 नुसार गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी लेखी तक्रार केल्या जात आहे. पण पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात मात्र टाळाटाळ केली जात आहे. रुफटॉप हॉटेल, अनधिकृतपणे साईड मार्जिनचा होणारा वापर आदी संदर्भात महापिालकेलाच लक्ष केले जात आहे.