पुणे – उच्चशिक्षित दाम्पत्याने दाखल केलेला घटस्फोटाचा दावा 21 दिवसांत कौटुंबिक न्यायालयाने मंजूर केला. दावा दाखल केल्यापासून घटस्फोटासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागतो. मात्र, दोघे दीड वर्षांपासून विभक्त आहेत. आणखी सहा महिने थांबणे शक्य नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निवाड्याच्या आधारे वकिलांनी न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिले. त्यानुसार हा कालावधी वगळून प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे यांनी हा निकाल दिला.
यात माधव आयटी क्षेत्रात, तर माधवी डॉक्टर आहे. (दोन्ही नावे बदललेली) दोघांमध्ये वैचारिक मतभेद निर्माण झाल्याने ते जुलै 2019 पासून विभक्त राहत आहेत. दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी येथील कौटुंबिक न्यायालयात ऍड. प्रणयकुमार लंजिले, ऍड. अनिकेत डांगे आणि ऍड. लक्ष्मण सावंत यांच्यामार्फत दावा दाखल केला. दि.6 जुलै रोजी रजिस्टर झालेला दावा 26 जुलै रोजी न्यायालयाने मंजूर केला. तो बाहेरगावी असतो. तर ती पुण्यात असते. दोघांना तीन वर्षांचा मुलगा असून, तो तिच्याकडेच राहणार आहे.
पती-पत्नी दोघांचे पटत नव्हते. दोघे पुन्हा एकत्र येऊ शकत नाही, हे त्यांनी ओळखले. परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोघांचा पुढे जाणारा वेळ वाचला. दोघेही स्वतंत्रपणे जीवन जगण्यास मोकळे झाले आहेत.
– ऍड. प्रणयकुमार लांजिले, अर्जदाराचे वकील.