पुणे – महापालिकेकडून शहर स्वच्छ केले जात असले तरी दुसर्या बाजूला शहराच्या प्रवेशद्वारांच्या मुख्य रस्त्याच्या परिसरातच मोठया प्रमाणात कचर्याचे ढीग साचतात. त्यामुळे शहराची प्रतिमा खराब होत असल्याने महापालिकेकडून आता शहराचे प्रवेशद्वार असलेल्या प्रमुख रस्त्यांचा परिसर स्वच्छ ठेवला जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून पालिकेकडून शनिवारी दिवेघाट परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
यातून तब्बल ९ टन कचरा उचलण्यात आला. हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून हा कचरा उचलण्यात आला. यामध्ये जेसीबी, ट्रक आदी साहित्यासह २० स्वतंत्र कर्मचारी सहभागी झाले होते, असे पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी सांगितले.
दिवे घाट परिसर पालिकेच्या हद्दीत येत नसला तरी महापालिकेची हद्द वडकीपासूनच सुरू होते, त्यामुळे पालिकेकडून वडकीपासून सासवडच्या दिशेला पूर्ण घाटात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. हडपसर क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रीय अधिकारी बाळासाहेब ढवळे, आरोग्य निरिक्षक सचिन लडकत यांच्या पथकाने ही स्वच्छता मोहीम राबविली.
शहराचे प्रवेशद्वार होणार स्वच्छ
महापालिकेची हद्द सुरू होताना शहरात येताना दिवेघाट, कात्रज घाट तसेच पिंरगुंटचा घाट आहे. या परिसरात मोठया प्रमाणात कचरा टाकलेला असतो. हडपसर तसेच नगर रस्त्यावर पालिकेची हद्द संपतानाही कचर्याचे साम्राज्य आहे. शहरात येताना प्रवासी, पर्यंटक तसेच शहराबाहेरील नागरिक पुण्यात मोठ्या प्रमाणात कचरा समस्या असल्याची भावना घेऊन जातात, त्यामुळे पालिकेने यापुढे शहरासोबतच शहराच्या प्रवेशद्वार असलेल्या भागात स्वछता करण्याचा निर्णय घेतला असल्याचे संदीप कदम यांनी सांगितले.