मांडकी डोह ते जेजुरी पाणीपुरवठा सुरळीत : भंडारा उधळून जलपूजन
नगरपालिकेने 40 लाखांची विजबिलाची थकबाकी भरली
जेजुरी – शहराला आता सोमवार (दि. 8) दोन दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. मांडकी डोह ते जेजुरी पाणीपुरवठा करणार्या पाइपलाइनमधून सुरळीत पाणीपुरवठा सुरू झाला आहे. शनिवारी (दि. 6) सकाळच्या सुमारास मांडकी डोहातून जेजुरीतील पाणीपुरवठा करणार्या स्टेशनवर पाणी पोहोचले. काँग्रेसचे माजी गटनेते सचिन सोनवणे, माजी नगरसेविका रुक्मिणी जगताप, माजी नगरसेवक हेमंत सोनवणे यांनी भंडारा उधळून पाण्याचे पूजन केले.
यावेळी माजी नगरसेवक बाळासाहेब दरेकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष ईश्वर दरेकर, सुशील राऊत, देवसंस्थानचे माजी विश्वस्त पंकज निकुडे-पाटील, नगरपालिकेचे पाणीपुरवठा पर्यवेक्षक राजेंद्र दोडके, बाळू कांबळे, दशरथ कुरूटकर, प्रमोद डिखळे, प्रशांत कुदळे आदी उपस्थित होते.
सध्या जेजुरी शहराला नाझरे (मल्हारसागर) जलाशयाच्या मृतसाठ्यातून तीन ते चार दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. तर गेल्या पाच वर्षांपासून मांडकी डोहावरील पाणीउपसा करणार्या पंपाचे दीड ते दोन कोटी रुपये वीजबिल थकीत असल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. तर पाइपलाइनची सुद्धा दुरवस्था झाली होती. त्यामुळे भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता; मात्र आमदार संजय जगताप यांच्यामध्यस्थी व प्रयत्नामुळे थकीत विजबिलावर तोडगा निघून प्रश्न मार्गी लागला आहे. नगरपालिका प्रशासनाने सुमारे 40 लाख रुपयांची विजबिलाची थकीत रक्कम भरली आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व नगरपालिका प्रशासन यांच्या निधीतून निकृष्ट व नादुरुस्त असलेली पाइपलाइन दुरुस्त करण्यात आली आहे. त्यामुळे आता शहरवासीय व भाविकांना पाणीपुरवठा नियोजन पद्धतीने करण्यात येणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले. यावेळी नगरपालिका कर्मचार्यांचा सन्मान करण्यात आला.
ही योजना फार खर्चिक
जेजुरी शहराला सध्या दररोज 50 लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे; मात्र मांडकी डोह ते जेजुरी असे सुमारे 23 कि. मी.अंतर असल्याने पाणी उपलब्ध होईल, तसे पाणीपुरवठा नियोजन करण्याची मागणी पालिका प्रशासनाला करणार आहे. सध्याच्या काळात ही योजना फार खर्चिक काम आहे. तसेच अंतर जास्त असल्याने सतत दुरुस्ती करावी लागणार आहे.त्यामुळे नागरिकांनी घरपट्टी व पाणीपट्टी नियमित भरून सहकार्य करावे, असे आवाहन नगरपालिकेच्यावतीने करण्यात आले.
आम्ही माजी लोकप्रतिनिधी आहोत सध्या प्रशासकीय कालावधी असला तरी ही योजना कार्यान्वित करून पाणी पुरवठा करण्यात येईल हा शहरवासीयांना दिलेला शब्द आम्ही पाळला आहे.
– हेमंत सोनवणे, माजी नगरसेवक