सामान्य कुटुंबातील सतीश आठवलेचे शिक्षण प्रेरणादायी
दैनिक प्रभातकडून आर्थिक मदतीसाठी पुढाकार
शिक्रापूर – सणसवाडी (ता. शिरुर) येथील सतीश अशोक आठवले या युवकाने परिस्थितीवर मात करीत उच्च शिक्षित होण्याचे स्वप्न बाळगले असताना २०२१ मध्ये सतीशची सध्या युके (स्कॉटलंड) मध्ये शिक्षणासाठी निवड झाली. आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असताना दैनिक प्रभातने सतीशसाठी मदतीचे आवाहन केले. त्याला काही मदत मिळाल्याने परिस्थितीशी झगडत सतीश याने स्कॉटलंडमधील पदवीचे शिक्षण पूर्ण केले. नुकतेच त्याला पदवी प्रदान केली आहे.
सणसवाडी येथील सतीश आठवले या युवकाने गावातील जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेऊन उच्च शिक्षणाचे ध्येय बाळगले, दरम्यान, शासनाच्या जवाहर नवोदय विद्यालयाची परीक्षा देत बाजी मारली. सहावी ते बारावीचे शिक्षण शासकीय जवाहर नवोदय विद्यालयातून पूर्ण करीत बारावीत चांगले गुण मिळवले. उच्च शिक्षित होण्याचे स्वप्न उराशी बाळगून मुंबईतील भारती विद्यापीठात इंजिनीअरसाठी प्रवेश मिळवून चार वर्षाचे शिक्षण २०२० मध्ये पूर्ण केले.मात्र, कोविडमुळे शेवटची परीक्षा ऑनलाइन झाली. मात्र, निकाल उशिरा जाहीर झाला.
त्यावेळी सतीशने बाहेर देशात शिक्षण घेण्याचे प्रयत्न सुरु केले. सतीशची युके (स्कॉटलंड) मधील विज्ञान डीस्टीलिंग उद्योजकता या उच्च पदवीधर शिक्षणासाठी निवड झाली. मात्र, युकेमधील शिक्षणासाठी त्याला तब्बल पस्तीस लाख रुपयांची आवश्यकता होती. परंतु परिस्थिती हलाखीची असताना देखील सतीशची आई रमाबाई आठवले व वडील अशोक आठवले यांनी शैक्षणिक कर्ज घेतले. यामध्ये काम होत नसल्यामुळे असताना दैनिक प्रभातने सतीश याच्यासाठी मदतीचे आवाहन केले होते.
काही मदत मिळाली. सतीशच्या आई वडिलांनी नातेवाईक व मित्रांकडून काही मदत गोळा केली. काही नागरिकांनी मदतीचा हात देऊ केला. सतीश याने परिस्थितीची जाणीव व आई वडिलांचे कष्ट हे माहित असल्याने जिद्दीने शिक्षण सुरु ठेवले होते, सध्या सतीशच्या शिक्षणाला दोन वर्षे पूर्ण झाले आहेत. नुकतेच सतीशला पदवी प्रदान केली असून त्याचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
सतीशची आस
आमच्या मुलाने लहानपणापासून जिद्द ठेवली होती. त्याची परदेशात शिक्षणासाठी निवड झाली. मात्र, आर्थिक अडचण आली, त्यावेळी आमचे नातेवाईक, मित्र मंडळी यांनी मदत केली. सध्या सतीशने जिद्दीने अभ्यास करीत पदवी मिळवल्याने आमच्या कष्टाचे चीज झाले. आता फक्त पुढील महिन्यास सतीश आम्हाला भेटणार असल्याची आस आम्हाला लागली आहे असे सतीशची आई रमाबाई व वडील अशोक आठवले यांनी सांगितले.