शंभर महिलांना कृषी पर्यटनासह विविध व्यवसायांची माहिती देणार
पौड : सावित्रीबाई फुले जयंती आणि पत्रकार दिनानिमित्त मुळशी तालुका पत्रकार संघ आणि काशिग येथील युनिक पाथस आणि फुलराई कृषी पर्यटन केंद्राच्या वतीने बुधवारी (3 जानेवारी) पौड येथे महिलांना व्यवसाय विषयक मार्गदर्शन करण्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत शंभर महिलांना कृषी पर्यटनासह विविध व्यवसायांची माहिती दिली जाणार असल्याचे संघाचे अध्यक्ष विनोद माझिरे यांनी सांगितले.
दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय कामगार शिक्षण व विकास मंडळ, श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार, प्रादेशिक संचालनालय पुणे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या सहकार्याने हे शिबिर होणार आहे.
पौडच्या जिल्हा मध्यवर्ती बँक सभागृहात त्याचे आयोजन केले आहे. महिला बचत गट, डिजिटल आणि आर्थिक साक्षरता, बँक अर्थसहाय्य, शासनाच्या प्रमुख योजना, पर्यटन व्यवसायातील विविध संधी, आधुनिक शेती आणि शेतीपूरक व्यवसाय या विषयावर महिलांना मार्गदर्शन केले जाणार आहे.