खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूर तालुका पिंजून काढला
इंदापूर – खासदार सुप्रिया सुळे यांनी सुसाट वेगाने इंदापूर तालुक्यातील सात जिल्हा परिषद मतदार संघातील गावांना भेटी देत, वेगवेगळे कार्यक्रम घेत. शेतकरी आक्रोश मोर्चा यशस्वी करत अक्षरशः तालुका पिंजून काढला आहे. त्यामुळे येणार्या लोकसभेच्या निवडणुकीआधीच इंदापूर तालुक्यात तर विरोधक घायाळ झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारला पाठिंबा देताच राष्ट्रवादी काँग्रेस दोन गटात विभागली गेली. त्यामुळे इंदापूर तालुक्यात खासदार सुप्रिया सुळे यांच्या मताचा टक्का कमी होणार की वाढणार, याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात होते; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची इंदापूर तालुक्यावर एक वेगळी कमांड गेल्या कित्येक दशकापासून आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्याबरोबर कोण आहे, कोण नाही. याचा विचार न करता, पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तेजससिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांच्यासह व सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सागर मिसाळ व महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष छायाताई पडसळकर यांना सोबतीला घेऊन, तालुक्यातील गावे न गावे पिंजून काढले आहेत.
या दौर्याला अधिकची भर माजी सभापती प्रवीण माने यांच्यामुळे पडले असून, जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम व आरोग्य विभागाच्या सभापती पद प्रवीण माने यांच्याकडे असताना त्यांनी इंदापूर तालुक्यातील प्रत्येक गावाला घसघशीत निधी दिला होता. तसेच सोनाई परिवाराच्या माध्यमातून युवक युवतींच्या हाताला काम देण्याची भूमिका सोनाई परिवार करत असल्यामुळे, एक नवीन फळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी उभी राहिल्याचे चित्र दिसते आहे.
दुसरीकडे आमदार दत्तात्रय भरणे आजही सोशल मीडियावर व जाहीर सभेत इंदापूर तालुक्याच्या विकासात खासदार सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा प्रामुख्याने उल्लेख करतात. एवढेच नव्हे तर सोशल मीडियावर सुप्रिया सुळे व शरद पवार यांचे फोटो टाकतात. त्यामुळे त्यामुळे इंदापूर तालुक्यात खासदारकीला सुप्रिया सुळे यांचा टक्का कमी होईल असे सध्या तर दिसत नाही.