पुणे – आरोग्य सेनेतर्फे सहा आणि सात जानेवारी रोजी दहावा स्मिता पाटील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (‘स्पिफ’) आयोजित करण्यात आला आहे. ‘नॅशनल फिल्म अर्काइव्ह ऑफ इंडिया’येथे हा महोत्सव होणार आहे. यानिमित्त रसिकांना २१ देशांमधील ४६ लघुपट पाहण्याची संधी मिळणार आहे. हा महोत्सव विनामूल्य आहे.
या महोत्सवासाठी या वर्षी जगातील ५० देशांतून २०० पेक्षा अधिक लघुपट दाखल झाले आहेत. यामध्ये भारतासह अमेरिका, इंग्लंड, इराण, स्वित्झर्लंड, लिथुवानिया, जर्मनी, फ्रांस, कॅनडा, स्पेन, सिंगापूर, रशिया, पोलंड, ग्रीस, चीन, अर्जेंटीना, अरब अमिराती, स्वीडन, पोर्तुगाल, नोर्वे, नेदरलॅन्ड, नेपाळ, मेक्सिको, मलेशिया, मासेडोनिया, कोरिया, जॉर्डन, इटली, आइसलंड, इजिप्त, झेक, कंबोडिया, ब्राझिल, ऑस्ट्रिया, ऑस्ट्रेलिया, कझागिस्तान या देशांमधील लघुपट रसिकांना पाहता येणार आहेत.
या महोत्सवाच्या अंतिम फेरीत निवड झालेल्या अनेक चित्रपटांच्या टीम महोत्सव काळात उपस्थित रहाणार असून, रसिकांना त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. चित्रपट दिग्दर्शक गगनविहारी बोराटे, अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सोहिल वैद्य आणि अमेरिकेतील प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते-लेखक बिजोन इमतीयाझ हे या महोत्सवाचे मानद ज्युरी म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत.
सहा जानेवारी रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आणि सात जानेवारी रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत या महोत्सवात अंतिम फेरीसाठी (फायनल स्क्रीनिंग ) निवडण्यात आलेले सुमारे ४६ लघुपट दाखवण्यात येणार आहेत. यावर्षी वर्ग संघर्ष आणि स्थलांतर या विषयांना चित्रपट निर्मात्यांनी प्राधान्य दिलेले आहे. अंतिम फेरीतील चित्रपटांमधून परितोषिक विजेते निवडण्यात येणार आहेत. ‘स्पिफ’ चा पारितोषिक वितरण समारंभ महोत्सवाच्या स्थळी, रविवारी सायंकाळी सात वाजता होणार असून आरोग्य सेनेचे राष्ट्रीय प्रमुख आणि स्पिफचे संस्थापक-संचालक डॉ. अभिजित वैद्य यांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे.