21 कोटीच्या निधीतून महत्त्वाकांक्षी योजनेला सुरुवात
जुन्नर – जुन्नरमधील नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळावे याकरिता 21 कोटी च्या निधीतून माणिकडोह धरणातून पाइपलाइनद्वारे पाणी पुरवठा योजना शासनाने मंजूर केली असून, येत्या आठ-दहा दिवसांत या महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. जुन्नर शहराकरिता 39 कोटींची भुयारी गटार योजना प्रस्तावित करण्यात आली असून, तिच्या मंजुरीकरिता पाठपुरावा सुरू असल्याचे जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी स्पष्ट केले.
शिवसेना शिंदे गट जिल्हा प्रमुख शरद सोनवणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून जुन्नर शहरातील विविध विकासकामांकरिता 2 कोटी 67 लाखांचा निधी मंजूर करून घेतला. या कामांचे भूमिपूजन शुक्रवारी (दि. २२) सोनवणे यांच्या हस्ते झाले.
यावेळी शहर प्रमुख अविनाश कर्डिले, अलका फुलपगार, शाम खोत, दिपेश परदेशी, दर्शन फुलपगार, पुष्कराज जंगम, गणेश पातूरकर, अकिल शेख, सिद्धांत लोणकर, रिजवान पटेल, इम्रान बेपारी, विकास राऊत, मनोज शिंदे, अशोक घोटणे, दशरथ साळवे, संतोष शेरकर, गणेश कासार आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
जुन्नरकरिता शासनाकडे मागणी करून मंजूर घेतलेल्या 2 कोटी 67 लाखांच्या निधीतून जुन्नरमधील विविध भागात सिमेंट रस्ते, डांबरीकरण रस्ते, नाला बांधकाम, समाज मंदिर, पाप गटार, रस्त्यालगत संरक्षक भिंत बांधकाम या विकासकामाचे भूमिपूजन झाले.
पद्मावती तलावाचे सुशोभीकरण लवकरच
राज्याचे मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांनी जुन्नर शहराला गेल्या दहा वर्षातील सर्वात जास्त निधी गेल्या काही दिवसात विकासकामांकरिता दिलेला आहे. शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या पद्मावती तलाव पर्यटनाकरिता सुशोभीकरण सुधारणा करण्याकरिता डीपीआर तयार करण्यात आला असून त्याच्या मंजुरीकरिता पाठपुरावा सुरू असल्याचे शरद सोनवणे यांनी स्पष्ट केले.