पुण्याहून भोरमार्गे महाडकडे जाणाऱ्या राज्यमार्गावर वरंध तथा वरंधा घाट हा 20 किलोमीटर लांबीचा डोंगरी रस्ता आहे. हा घाट सह्याद्रीच्या उभ्या धारेवर असलेल्या कावळ्या किल्ल्याला दुभंगून देशावरून कोकणात उतरतो. घाटाच्या समोरच्या डोंगरकुशीत, गर्द झाडीत समर्थ रामदासस्वामींची शिवथरघळ आहे.
महाडपासून 25 कि लोमीटर, पूर्व पुण्यापासून 110 किलोमीटर अंतरावर आहे. वरंधा घाटरस्त्यावर मुख्य आकर्षण असलेले वाघजाई माता मंदिर आहे. या ठिकाणापासून, दरीतील आणि धबधब्यांवरील सुंदर दृश्ये दिसतात. कोकणाच्या दिशेला 3 हजार फुटांच्या खोल दरीमुळे वस्त्यांसह अतिशय खडबडीत खोरी आहेत.
भोर शहराच्या दक्षिणेला श्री वाघजाईनगर परिसरात असलेले वाघजाई देवीचे प्राचीन मंदिर हे भोरवासीयांचे दैवत मानले जाते. श्री वाघजाई देवी मंदिर ट्रस्टमार्फत मंदिराची देखभाल अत्यंत चांगल्या पध्दतीने केली जात असून, मंदिर परिसरात भाविकांसाठी अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या वाघजाई मंदिरास महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व तीर्थक्षेत्र विकास विभागामार्फत देवस्थानला “क’ दर्जा मिळाला आहे.
भोर शहराचे ग्रामदैवत म्हणूून ओळखल्या जाणाऱ्या श्री वाघजाई देवीचे मूळस्थान हे रोहिडेश्वर किल्ल्याच्या डोंगरावरील घाटमाथ्यावर आहे. त्यास वरची वाघजाई म्हणून संबोधले जाते. पूर्वी सर्व भाविक हे वरच्या वाघजाईला चालत जात असत. भेलकेवाडी भोर येथील एक भक्त रोजच भोरदऱ्यातील श्री वाघजाई देवीच्या दर्शनाला जात असे. वृध्द झाल्याने त्याला नंतर डोंगरावर जाणे शक्य होत नव्हते. म्हणून त्याने देवीला प्रार्थना केली.
देवीने त्याला दृष्टांत दिला की, तू एकदाच शेवटचे दर्शनाला ये आणि मागे न पाहता पुढे जात राहा. जिथे तू मागे पाहशील तेथे मी प्रकट होईल. डोंगरावरून चालत आल्यानंतर पायथ्याला भाविकाने मागे वळून पाहिले, त्यावेळी तिथे देवी प्रकट झाली. पाण्याचे झरेही तयार झाले. तिथेच वाघजाई देवीचे छोटे मंदिर बांधण्यात आले असून पाण्याचे झरे आजही सुरू आहेत.
परिसरात छोटा बगीचा आणि मुलांसाठी खेळणी ठेवण्यात आले. मंदिरातील देवीच्या मूर्ती, भव्य गाभारा, भाविकांसाठी पाण्याची व बैठकीची व्यवस्था, स्वच्छतागृह, सीसीटीव्ही यंत्रणा, सांस्कृतिक भवन बांधण्यात आले. मंदिर परिसरात आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या नागरिकांची लग्नकार्ये आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी याचा लाभ मिळतो.
वाघजाई मंदिरात दररोजच्या धार्मिक कार्यक्रमांशिवाय शारदीय नवरात्र महोत्सव दरवर्षी साजरा केला जातो. मंदिरात घटस्थापना, महापूजा, अभिषेक, भजन, किर्तन, होमहवन, पालखी प्रदक्षिणा, महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. ट्रस्टकडून गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि आर्थिक मदत केली जाते, आरोग्य शिबिरे घेतली जातात. नेत्र तपासणी व शस्रक्रीया मोफत केली जाते. अनेक दानशूर भाविक विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी ट्रस्टकडे देणगी जमा करतात.
मंदिराचा जीर्णोद्धार
वाघजाई मंदीराचा पहिला जीर्णोद्धार 1985 साली करण्यात आला. त्यावेळी पाण्याच्या झऱ्याला टाके (कुंड) शेजारी दगडी भिंत व पत्रा वापरून मंदिर बांधले. त्याचवेळी श्री वाघजाई देवी मंदिर ट्रस्टची स्थापना करण्यात आली. ट्रस्टमध्ये प्रथम 5 आणि नंतर 12 विश्वस्त करण्यात आले. 2013 साली मंदिराचा दुसरा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंदिराभोवतीचा खड्डा भरून 2016 पर्यंत मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले.
श्री वाघजाई देवी मंदिर ट्रस्ट
विश्वस्त मंडळ पुढीलप्रमाणे – जगन्नाथ लक्ष्मण भेलके -पाटील (अध्यक्ष), सुरेशचंद्र गुजराथी (सचिव), यशवंत भेलके (सहसचिव), लक्ष्मण (अप्पा) राऊत (व्यवस्थापक), बलदेव बांदल, निवृत्ती किवळे, यशवंत डाळ, जगन्नाथ मारुती भेलके, अनंता शिर्के, सागर शेटे, रमेश सेठ ओसवाल,दिलीप मळेकर, डॉ. उदय पेंडसे, गणेश बांदल व रवी कोंढाळकर (सर्व विश्वस्त).
भुजंगराव दाभाडे