चित्रसेन जवळकर यांचा सर्पदंशाने मृत्यू : गावचा ऊरूस रद्द
लोणी काळभोर : आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथील शेतातील मोटर बंद करण्यासाठी गेलेले चित्रसेन पांडुरंग जवळकर या तरुण शेतकऱ्याला सर्पदंश झाल्याने रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. गावकऱ्यांनी गावाचा उरूस रद्द करीत त्यांना आगळी वेगळी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
चित्रसेन पांडुरंग जवळकर हे अत्यंत शांत, संयमी, हसतमुख असलेल्या व्यक्तिमत्त्व पण त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबासह गावावर मोठा आघात झाला. अनेकांनी हळहळ व्यक्त केली.
चित्रसेन हे आळंदी म्हातोबाची येथील श्री म्हातोबा जोगेश्वरी नवरात्र उत्सव कमिटीचे अध्यक्ष होते. प्रत्येक सामाजिक कार्यात त्यांचा नेहमीच सहभाग असायचा. हा तरुण हरहुन्नरी कार्यकर्ता अचानक निघून गेल्याने सर्व गावकऱ्यांनी मिळून हा निर्णय घेतला.
गावचा उरूस हा येत्या दि. ४ आणि ५ जानेवारी २०२४ रोजी असून संपूर्ण गावाने हा उरूस साजरा न करण्याचा एकमताने निर्णय घेत जवळकर यांना खऱ्या अर्थाने सार्वजनिक श्रद्धांजली अर्पित केली आहे.
आगामी काळात उरुस असलेल्या महिन्यात अशी काही वाईट घटना घडली तरी गावाने उरूस रद्द करण्याचे ठरविले आहे. गावच्या निर्णयाने आसपासच्या परिसरातील ही गावांना एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. गावखेड्यामध्ये अजूनही माणुसकी जिवंत आहे याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे.