राजगुरूनगर : खेड पंचायत समिती आवारात वाहन चालकांकडून बेशिस्त गाड्या लावल्या जात असल्याने अनेक नागरिकांना व वाहन चालकांना त्रास होत आहे.
खेड पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे काम सध्या असलेल्या पस इमारतीच्या पुढील जागेत सुरू आहे. या जागेत पूर्वी पार्किंग केले जात होते मात्र कामाला सुरुवात झाल्याने खेड पंचायत समितीमध्ये येणाऱ्या चार चाकी गाड्या अस्ताव्यस्त पार्किंग केल्या जातात एवढेच नाही तर पार्किंग करून गाडी मालक बेपत्ता होतात. मागील गाडी काढण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागते.
खेड पंचायत समिती समोर असलेल्या मोकळ्या जागेत सरकारी वाहने लावली जातात मात्र या ठिकाणी ठेकेदारांच्या गाड्या लावल्या जात आहेत हे ठेकेदार गाड्या लावताना दुसऱ्यांचा विचार करीत नाहीत कशाही आडव्या तिडव्या गाड्या लावतात शिवाय या गाड्या दिवसभर एका जागेवर उभ्या असतात.
खेड पंचायत समितीवर सध्या प्रशासक म्हणून गटविकास अधिकारी अजय जोशी काम पाहत आहेत; मात्र अस्ताव्यस्त लावलेल्या गाड्यांबाबत काहीच निर्णय घेत नसल्याने दिवसा गानिक येथील बेशिस्त पार्किंगचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकजण पंचायत समितीच्या गेट वर गाड्या पार्क करीत आहेत त्यामुळे आत जाणाऱ्या व पंचायत समितीतून बाहेर जाताना चालकांची मोठी अडचण होत आहे.
राजगुरूनगर शहर झपाट्याने वाढले आहे लोकसंख्या बाजार पेठ वाढल्याने आणि वाहनाची संख्या त्या प्रमाणत वाढल्याने पार्किंगची समस्या भेडसावत आहे. त्यावर कोणताच पर्याय काढण्यास प्रशासन अपयशी बनले आहे. केवर पथारी धारकांना लक्ष करीत वेळ मारून नेली जात आहे प्रत्यक्षात पार्किंग व्यवस्थेकडे पोलिस यंत्रणा नगर परिषद, खेड पंचायत समिती यांचे दुर्लक्ष झाले आहे.
अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
खेड पंचायत समिती समोरील उपलब्ध जागा शहरातील पार्किंग स्थळ बनले आहे. खेड पंचायत समितीवर अधिकाऱ्यांची भूमिका याला कारणीभूत आहे. अधिकारी वर्ग याकडे दुर्लक्ष करीत आहेत वाहन चालकांवर कारवाई करीत नाही त्यामुळे चारचाकी धारक गाड्या पार्किंग करतात. कर्मचाऱ्यांना पुढे करून अधिकाऱ्यांच्या गाड्या काढण्यासाठी पुढे लावणाऱ्या गाडी मालकाला विनंत्या केल्या जात असल्याने याचा फायदा वाहन चालक मालकांनी घेत खेड पंचायत समिती पार्किंग स्थळ बनविले आहे.