संगमनेर – तालुक्यातील काही ग्रामपंचायतीच्या झालेल्या पोटनिवडणुकीत सर्व जागांवर आमदार थोरात गटाच्या कार्यकर्त्यांनी विजय मिळवला. तालुक्यातील शिबलापूर, पिंपळगाव देपा, पोखरी हवेली, नांदुरी दुमाला या गावांमधील पाच जागांकरिता पोटनिवडणुका झाल्या. यामध्ये आश्वी गटातील शिबलापूर ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत आ. थोरात गटाच्या गीतांजली संदीप मुन्तोडे व करुणा सागर मुन्तोडे मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या.
पिंपळगाव देपामधून नाना गांजवे, पोखरी हवेलीमधून संचिता दिनकर घुले व नांदुरी दुमाला येथून वैशाली अमोल कराळे विजयी झाल्या आहेत. हे सर्व उमेदवार आ. बाळासाहेब थोरात गटाचे आहेत. या सर्व उमेदवारांचे यशोधन जनसंपर्क कार्यालयात आ. बाळासाहेब थोरात व कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या वेळी आ. थोरात यांनी, निवडणूक ही लोकशाहीमधील प्रक्रिया असून, निवडणुकीनंतर सर्वांनी आपसांतील मतभेद दूर करून गावच्या विकासासाठी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहनही केले. या वेळी कार्यकर्त्यांनी आ. बाळासाहेब थोरात जिंदाबादच्या घोषणा देऊन परिसर दुमदुमून सोडला. फटाक्यांच्या आतिषबाजी करत उमेदवारांनी विजयोत्सव साजरा केला.