पाच ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी पुरस्कृत सत्ता : तांदळीत महाविकास आघाडीचा पॅटर्न
माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या गडाला सुरूंग
शिरूर – तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुका चुरशीने झाल्या. या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांना फटका बसला आहे. पाच ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत व तांदळी येथे शिवसेना राष्ट्रवादी कॉंग्रेस महाविकास आघाडीचा 10/1 असा विजयी झाला आहे.
शिरूर तहसील कार्यालय सभागृह येथे मतमोजणी पार पडली. तहसीलदार रंजना उंबरहांडे व निवासी नायब तहसीलदार स्नेहा गिरीगोसावी, महसूलचे सहायक जगदीश खेडकर, करणसिंग जारवाल, विजय बेंडभर, एकनाथ ढाके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
टाकळी हाजी, जांबूत आणि नव्याने स्थापन झालेल्या म्हसे, माळवाडी, शरदवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल धक्कादायक जाहीर झाला आहे. दामुशेठ घोडे यांनी माळवाडी, म्हसेसह टाकळी हाजी ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता मिळवत असताना माजी आमदार पोपटराव गावडे यांना धोबीपछाड दिला आहे. घोडे यांच्या पॅनलच्या विजयाने बेट भागात प्रथमच पोपटराव गावडे यांच्या घराण्यासमोर प्रबळ राजकीय पर्याय उभा राहिला असून, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत ते राष्ट्रवादीचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
ग्रामपंचायतनिहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे- शरदवाडी ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयी पुढीलप्रमाणे- प्रभाग 1- बाबुराव सबाजी जोरी, कोमल बिभीषण औटी, छाया विठ्ठल सरोदे, प्रभाग दोन- हरिभाऊ गंगाराम सरोदे, मंदाबाई रामदास गांजे, प्रभाग क्रमांक तीन- अशोक दंतू गांजे, पुष्पा पोपट गांजे.
माळवाडी ग्रामपंचायत विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे- प्रभाग क्रमांक 1- आदिनाथ शिवाजी भाकरे, सुनीता सुरेश भाकरे, नीलम अनिल रसाळ, प्रभाग क्रमांक 2- आनंदा विठ्ठल भाकरे, साधना राहुल गारुडकर, प्रभाग क्रमांक 3- सोमनाथ रफिक भाकरे, पूजा दौलत पांढरकर. म्हसे बुद्रुकमधील विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे- प्रभाग क्रमांक 1- सौरव पाटील बुवा पवार, दामिनी हनुमान मुसळे, मंगल जयवंत मुसळे. प्रभाग क्रमांक 2- मंदा सदाशिव वेताळ, जालिंदर संता मुसळे, प्रभाग क्रमांक 3- निलेश नरसाळे, प्रियंका जालिंदर खाडे.
शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला
शिरूर तालुक्यातील महत्त्वाची समजली जाणारी तांदळी ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस या महविकास आघाडीचा पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे. शिवसेनेचे माजी पंचायत समिती सदस्य समन्वयक जिल्हा समन्वयक मच्छिंद्र गदादे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रा. सुभाष कळसकर यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवून विजयी झाले तर पंचायत समिती सदस्य राजेंद्र गदादे यांच्या पॅनलचा पराभव झाला असून यात महाविकास आघाडी पॅनलला दहा तर भाजपा पुरस्कार एक जागा मिळाली. शिरूर तालुक्यात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शिंदे गटात गेल्यानंतर शिरूर तालुक्यात शिवसेनेचे जादू आढळराव यांच्या जाण्याने काही फरक पडलेला नाही. त्यामुळे शिरूर तालुक्यात शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह दिसत आहे.