पालिकेच्या आदेशानंतरही ग्रामीण रुग्णालय परिसरात परिस्थिती “जैसे थे’
आळंदी – आळंदीतील ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या मार्गावर म्हणजेच पोलीस चौकी ते आळंदी ग्रामीण रुग्णालयपर्यंतच्या रस्त्यावर भाजी विक्रेत्यांनी बसू नये असा निर्णय मार्च 2023मध्ये झाला होता; मात्र सध्यस्थितीत नगरपालिकेच्या या आदेशाला विक्रेत्यांनी हारताळ फासला आहे. व्यावसायिकांनी पूर्वीसारखे पुन्हा याच रस्त्यावर व्यवसाय थाटले आहेत.
तत्कालीन तहसीलदार, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एका बैठकीत झाला होता. तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या त्या रस्त्यावर बसणाऱ्या भाजीसह इतर विक्रेत्यांवर कारवाई केली जाणार असेही त्यावेळी ठरले होते. तसेच या बैठकीत आळंदी ग्रामीण रुग्णालय अधीक्षक उर्मिला शिंदे यांनी आठवड्यात ग्रामीण रुग्णालयात किती रुग्ण येतात? तसेच रुग्णांबरोबर जे नातेवाईक असतात त्यांची आकडेवारी त्यावेळी सांगितली होती.
रुग्णवाहिकेतून गर्भवती महिला प्रसूतीच्या वेळी ग्रामीण रुग्णालयात किती आणल्या जातात, यासाठी येथील रस्ता का अतिक्रमण मुक्त असावा? याची सविस्तर माहिती त्यांनी त्यावेळी दिली होती. या बैठकीत रस्त्यावरील अतिक्रमण मुक्ततेसाठी अतिक्रमण विभाग सदैव तत्पर रहावा, असे असतनाही पालिकेतील अतिक्रमण विभागातील व्यक्तीच कारवाईसाठी हजर नसतात.
शेतकरी भाजी विक्रेते वर्गासाठीसुद्धा जागेची व्यवस्था करावी. ग्रामीण रुग्णालयाच्या रस्त्यावर भाजी मंडई बसते यावर या बैठकीत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी डी. डी. भोसले पाटील यांनी केली होती; परंतु, गेल्या काही दिवसापासून परत ग्रामीण रुग्णालयाच्या या रस्त्यावर सकाळी, सायंकाळी पुन्हा काही भाजी विक्रेते बसल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या मेन गेटच्या शेजारीच दोन्ही बाजूने विक्रेते बसलेले असतात.
कारवाईचा धाकच राहिला नाही
ग्रामीण रुग्णालयाच्या रस्त्यावर इतर ठीकठिकाणी भाजी विक्रेते, हातगाडी भाजी विक्रेते भाजी विक्री करताना दिसून येत आहेत. यामुळे नगरपालिकेच्या कारवाईचा धाक तेथील रस्त्यावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर राहिलेला नाही. अशी चर्चा गावात रंगत आहे.
वाहनांच्या पार्किंगने आणखी भर
या रस्त्यावर दुचाकी ही पार्किंग केलेल्या असतात. त्यातच भाजी विक्रेते तेथे भाजी विक्री करता बसल्याने व वाहने पार्क केल्याने ग्रामीण रुग्णालयाचा रस्ता अरुंद होतो. रुग्णवाहिकेलाही या रस्त्यावरवरून ये-जा करण्यासाठी रस्ता अरुंद राहत आहे.