रांजणगाव गणपती (वार्ताहर)- येथील गणेगाव फाट्यावर एका प्रवाशाला मारहाण करुन लुटमार करण्यात आली. याप्रकरणी पाच पैकी दोन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली.
शरद उर्फ सदानंद गंगाधर जवक (वय 22) श्रीकांत दत्तात्रय सरोदे (वय 22 वर्ष दोन्ही रा. रांजणगाव मशीद ता. पारनेर जि. अहमदनगर) या दोघांना अटक करण्यात आली आली. दि.15 नोव्हेंबर रोजी अमित मनोहर खराडे, (वय 28 वर्ष, मु. मुंगुसगाव पोस्ट विसापूर ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) हे मोटरसायकलवरून पुण्याला जात असताना मौजे रांजणगाव गणपती मंदीराचे पाठीमागे दोन पल्सर मोटारसायकलवरील अनोळखी तीन ते चारजणांनी फिर्यादीस थांबवून तू अंगावर का थुंकलास असे म्हणून त्याला मारहाण केली.
त्याची हिरोहोंडा शाईन मोटर सायकल कीमत 35 हजार, वीवो व रेडमी कंपनीचे दोन मोबाईल किंमत 25 हजार, रोख रक्कम पाचशे रूपये, डेल कंपनीची बॅग 1 हजार रुपये, बॅंक एटीएम व इतर कागदपत्रे असा मुद्देमाल जबरीने चोरून घेऊन गेले होते.
आरोपींकडून गुन्ह्यातील चोरलेला एमआय कंपनीचा मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल मिळून आलेली असून आरोपींना रांजणगाव पोलीस स्टेशन येथे पुढील कार्यवाही करीता हजर करण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत करीत आहेत.