डिजिटल सातबाऱ्यात पुणे जिल्हा अव्वल

थेऊर – राज्यात ई- फेरफार आज्ञावली प्रकल्पांतर्गत आतापर्यंत सहा लाख 56 हजार 894 डिजिटल स्वाक्षरीयुक्‍त सातबारा उतारे डाऊनलोड करण्यात आले आहेत. त्यामध्ये पुणे जिल्हा प्रथम स्थानावर असून खातेदार शेतकरी व नागरिकांना घरबसल्या सातबारा उतारे मिळू लागल्याने त्यासाठी तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार नसल्याची महत्त्वपूर्ण माहिती ई फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी “प्रभात’शी बोलताना दिली.

पुणे जिल्ह्यातील सातबारा उताऱ्यांची संख्या 14 लाख 89 हजार 514 आहे. त्यापैकी 14 लाख 38 हजार 880 उतारे डिजिटल स्वाक्षरीयुक्‍त झाले आहेत. आतापर्यंत 56 हजार 894 उतारे पुण्यामधून डाऊनलोड करण्यात आले आहेत. हे प्रमाण राज्यात सर्वांत जास्त आहे.

सातबारा उतारावर डिजिटल स्वाक्षरी असल्याने सर्व शासकीय कामासाठी सातबारा ग्राह्य धरण्यात येत आहे. पुण्यानंतर अकोला व यवतमाळ दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर जिल्हे आहेत. सर्वांत कमी प्रमाण मुंबई उपनगर आणि गडचिरोली जिल्ह्यात आहे. राज्यात आतापर्यंत सुमारे सहा लाख 65 हजार उतारे डाऊनलोड करण्यात आले आहेत.

ई- फेरफार प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. राज्यात दोन कोटी 52 लाख 32 हजार उताऱ्यांपैकी दोन कोटी 37 लाख 86 हजार उतारे डिजिटल स्वाक्षरीयुक्‍त करण्यात आले आहे. ऑनलाइन सातबारासाठी नागरिकांना एका डिजिटल स्वाक्षरीयुक्‍त सातबाराकामी केवळ पंधरा ते वीस रुपये मोजावे लागतात.

अंत्यत कमी वेळात डिजिटल स्वाक्षरी सातबारा उपलब्ध होत असल्याने नागरिकांचा मोठा वेळ वाचत आहे. डिजिटल स्वाक्षरीयुक्‍त उतारे उपलब्ध करण्याचे पुणे डिव्हीजनमधील पाचही जिल्ह्यांतील काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. पुणे जिल्ह्यातील सुमारे 97 टक्‍के काम पूर्ण झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 93 टक्‍के, सांगली व सातारा जिल्ह्यातील प्रत्येकी 95 टक्‍के व सोलापूर जिल्ह्यातील काम 97 टक्‍के पूर्ण झाले आहे.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.