पुणे जिल्हा ; महाविकास आघाडीत”ठोशा’

शिरूर तालुक्‍यात शिवसेना-राष्ट्रवादीत द्वंद्व
गोड कार्यक्रमाला राजकीय “कडू’ रंग
“घरात घुसून मारू’ला ठोशा लगवण्याचे प्रतिउत्तर : स्थानिक नेत्यांची भाषा
रोहन मुजूमदार
पुणे –
शिरूर तालुक्‍यातील रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या साखर वाटपावरून महाविकास आघाडीतील शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये ठोशाचे “द्वंद्व’ जुंपले आहे. शिवसेनेचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळाराव पाटील यांनी घरात घुसून मारण्याची भाषा वारपल्यानंतर शिरूर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष रवी काळे यांनी “ठोशाचे उत्तर ठोशा’ने देऊ असे प्रतिउत्तर दिल्याने महाविकास आघाडीतील प्रमुख दोन पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर “ठोशा’चे राजकारण रंगले आहे.

घोडगंगा कारखान्याच्या वतीने पुण्यातील सभासदांना पुण्यात साखर वाटप कार्यक्रमात कारखान्याचे अध्यक्ष तथा शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार व कारखान्याचे संचालक तथा शिवसेनेचे शिरूर तालुका प्रमुख सुधीर फराटे यांच्यात बाचाबाची झाली. आमदार पत्नी तथा जिल्हा परिषद सदस्या सुजता
पवार व मेहुण्याने हल्ला केल्याचा आरोप फराटे यांनी केला आहे.

आमदार पवार यांनी हा आरोप फेटाळून लावत चांगल्या कार्यक्रमात फराटे यांनी “खो’ घातल्याचे म्हटले आहे. दरम्यान, फराटे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवण्यासाठी शनिवारी (दि. 7) मांडणगाव फराटे बंद ठेवत आमदार अशोक पवार यांच निषेध नोंदवण्यात आला. तर याला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने रविवारी (दि. 8) शिरूर बाजार समितीच्या सभागृहात निषेध सभा घेत जशास तसे उत्तर दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील दोन पक्षांमध्ये सुरू असलेले वाद काही केल्या शमण्याचे नाव घेत नाही.

राष्ट्रवादी कॉंग्रेसलेला सत्तेचा दर्प चढला आहे. शिवसेनेच्या तालुका प्रमुखांना मारहाण होत असेल तर शिवसैनिक गप्प बसणार नाही. तो घरात घुसून मारेल. महाविकास आघाडीत एकत्र असलो तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून योग्य तो मान दिला जात नाही. आम्हाला त्याची अपेक्षा पण नाही एकत्र काम करण्यापेक्षा उलट शिवसैनिकांचे खच्चीकरण करण्याचे काम सुरू आहे. जनतेच्या प्रश्‍नांसाठी लढणाऱ्याला जर दादागिरीची भाषा वापरली जात असेल तर शिवसैनिक गप्प बसणार नाही.

घोडगंगा कारखान्याच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे बिगर ऊस उत्पादकांची बडेजाव सुरू आहे. सत्तेत एकत्र असूनही नेते हाणामारीच्या भाषा करीत असतील तर कार्यकर्ते काय धिंगाणा घालत असतील? भाजप राजकारण करीत नसून सत्याच्या बाजूने उभा आहे. यांच्या भ्रष्टाचाराचे पितळ भाजप उघडे पाडत असल्याने त्यांची हवा गुल झाली आहे. काही झाले तरी भ्रष्टाचाराविरोधातील सत्याचा लढा थांबणार नाही.
– संजय पाचंगे, जिल्हाध्यक्ष, उद्योग आघाडी पुणे जिल्हा (ग्रामीण), भाजप

शिवसेना तालुका प्रमुखांच्या खांद्यावर भाजप बंदूक ठेवून संधीसाधून राजकारण करीत आहेत. आमदार आशोक पवार जिद्दीने विकासकामे करीत असून ही विकासकामे भाजपला मान्य नाही म्हणून ते खोडसाळपणे मुद्दाम राजकीय हेतुने चिखलफेक करून बदनाम करीत आहेत. सुधीर फराटे यांना मारहाण झाल्याच्या खोट्या बातम्या पसरवून राजकीय षड्‌यंत्र शिजवले जात आहे. तसेच माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील ज्येष्ठ नेते असून त्यांच्या तोंडून घरात घुसून मारू ही भाषा शोभत नाही.
– रवी काळे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिरूर

भाजपने साधली संधी?
शिवसेनेचे आहे म्हणून नव्हे तर ऊस उत्पादकांसाठी ते लढा देत असून त्यांच्यावर जर अन्याय होत असेल तर त्यांच्याबाजूने उभा असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. दरम्यान, आमदार बाबुराव पाचर्णे यांचा पराभव झाल्यानंतर त्यांची प्रकृती ढासळल्याने ते राजकारणातून थोडे बाजुला गेले आहेत. त्यामुळे शिरूर तालुक्‍यात भाजपला मरगळ आली होती. मात्र, कार्यकर्त्यांना विविध पदांचे बळ देत पक्षश्रेंष्ठींनी कार्यकर्त्यांना जिवंत केले. त्यातच राष्ट्रवादी-शिवसेनातील “ठोशा’मध्ये भाजपनेही उडी घेऊन शिवसेनेच्या फराटे यांना पाठिंबा देत संधी साधून आमदारांवर निशाणा साधून राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.