कराड – गेल्या काही वर्षापूर्वी चिनी आकाश कंदील बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीस येत होते. विविध प्रकारातील या आकाश कंदीलांसह चिनी वस्तूंना मागणी होती. मात्र, भारत-चीन दरम्यान सीमेवर झालेल्या तणावग्रस्त परिस्थितीमुळे चिनी वस्तूंची मागणी कमी झाली आहे. ग्राहक यंदा स्वदेशी बनावटीच्या आकाश कंदीलांची मागणी करत असून त्यातही पुन्हा पारंपरिक आकाश कंदीलाना पसंती मिळत असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, दिवाळीवर करोनाचे सावट असलेतरी करोनाचे संक्रमन कमी झाल्याने गेल्या आठ महिन्यांपसून स्वतःला आपल्या घरात कोंडून घेतलेला समाज दिवाळी साजरी करण्यासाठी बाजारपेठेत दाखल झाला आहे. दिवाळीसाठी लागणाऱ्या फराळचे साहित्य, श्री महालक्ष्मीच्या पुजेसाठी नवीन कपडे, वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी करत आहे.
येथील मुख्यबाजारपेठ अक्षरशः फुलून गेली आहे. तोंडावर मास्क लावून अबालवृध्दांपासून ते बालगोपाळांपर्यंत सर्वजण बाजारपेठेत खरेदीसाठी दाखल झाले आहेत. गेल्या आठ महिन्यात करोनामुळे संपूर्ण बाजारपेठ बंद होती. पाडवा गेला, दसरा गेला, ईद गेली तसेच गणेशोत्सव व नवरात्रीही गेली. महामारीमुळे लोकांनी अक्षरशः स्वतःला आपल्या घरात कोंडून घेतले. बाजारपेठेत फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकान सुरू दिसली. या आठ महिन्यातील संयमाचे फलीत म्हणून करोनाचा स्फोट होता होता राहिला आहे.
सप्टेंबर महिन्यात करोनाचा प्रार्दुभाव वाढल्याने ही महामारी मानव जातीचा शेवट करते की काय? अशी भीती निर्माण झाली होती. मात्र, करोनावर नियंत्रण मिळवण्यात शासनाला यश आले. यात सर्वात मोठी भूमिका करोना वॉरियर्सनी बजावली असलीतरी महत्वाचा वाटा सर्वसामान्य माणसाचा राहिला आहे. त्यामुळे दिवाळीचा सण साजरा करण्याची संधी आज मिळाली आहे.
बाजारपेठेतील किरणा दुकाने, विविध इलेक्टॉनिक्स्, कापड, सोने-चांदीसह विविध दुकाने गर्दीने गजबजली आहेत. याशिवाय दिवाळीसाठी लागणाऱ्या पणत्या, वैविध्यपूर्ण आकाश कंदील विक्रीस आले आहेत. वाढत्या महागाईमुळे आकाश कंदीलांच्या किंमतीत यंदा 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. चांदणी आणि गोलाकार जाळीच्या विविध आकाराचे तसेच डमरूच्या आकाराचे कंदिलही ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. पर्यावरणस्नेही पारंपरिक आकाश कंदिलांची मागणी मात्र वाढली आहे. दिवाळीत आकाशकंदील आणि त्यानंतर दिवाणखान्यात झुंबर किंवा नाइट लॅम्प म्हणून उपयोगी येतील, अशा काचांनी सजवलेल्या आकाश कंदिलांना ग्राहकांची यंदा पसंती मिळत आहे.