*आर्थिक गाडा रुळावर
* भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला पाठपुरावा
लोणी काळभोर – हवेली तालुका भारतीय जनता पक्षाच्या उपोषणामुळे हवेली तालुक्यात सोमवार (दि. 29) पासून 11 गुंठ्यांच्या दस्त नोंदणीस सुरुवात होणार आहे. अकरा गुठ्यांची दस्तनोंदणी सुरु होणार असल्याने हवेलीचा अडकलेला आर्थिक गाडा पुन्हा एकदा रुळावर येणार आहे.
हवेली तालुक्यात 11 गुंठ्यांची खरेदी खते सुरु व्हावीत या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप भोंडवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरुवारी (दि.25) विधानभवनासमोर केलेल्या उपोषणाला यश आले आहे. हवेली तालुका भारतीय जनता पक्षाच्या विनंतीनुसार बागायत जमिनीकरिता 11 गुंठे व जिरायत जमिनींसाठी 20 गुंठ्यावरील शेतजमिनींच्या खऱेदी-विक्रीची दस्त नोंदणी, नियमांच्याअधीन राहून सुरु करणार असल्याची घोषणा जिल्हा निबंधक अनिल पारखे यांनी परिपत्रकाच्या माध्यमातून केली आहे.
दरम्यान, पारखे यांनी महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंधबाबत व एकत्रिकरणाबाबत अधिनियममध्ये नमूद प्रमाणभूत क्षेत्र बागायत जमिनीकरिता 11 गुंठे व जिरायतसाठी 20 गुंठ्यावरील शेतजमिनींचे दस्त नोंदणीबाबत खरेदीदाराकडून शेतकरी असल्याबाबतचा पुरावा घेऊन, दस्तनोंदणीबाबतच्या सूचना निबंधक कार्यालयांना देण्यात येणार असल्याचेही पारखे यांनी स्पष्ट केले आहे.
हवेली तालुक्यात काही महिन्यांपासून मुद्रांक व नोंदणी विभागाने तुकडाबंदी व तुकडाजोड कायदा 1947 नुसार राज्यातील 11 गुंठे जमिनीचा तुकडा पाडून विक्री करण्यास अथवा जमिनीची नोंदणी करण्यावर प्रतिबंध घातला होता. या आदेशावर औरंगाबाद खंडपीठाने मुद्रांक व नोंदणी विभागाचा परिपत्रक रद्द करण्याचा निर्णय दिला होता.
हवेली तालुक्यात 11 गुंठ्यांची दस्तनोंदणी सुरु करण्यासाठी झालेल्या आंदोलनात जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, धर्मेंद्र खांडरे, दादा सातव पाटील, प्रवीण काळभोर, भाजपचे हवेली तालुकाध्यक्ष संदिप भोंडवे, भाऊसाहेब शिंदे, प्रदीप सातव, कमलेश काळभोर, नवनाथ काकडे, नितीन काळभोर, आप्पा काळभोर, किरण काळभोर, नवनाथ काळभोर, सरपंच स्वप्नील उंद्रे, विपुल शितोळे, भाऊसाहेब थिटे, विजय जाचक, शरद आव्हाळे, श्रीमंत झुरुंगे, रूपेश शिवले, विशाल गुजर, शशिकांत गायकवाड, संतोष झरांडे, अतुल काळभोर, आबा गायकवाड, शामराव गावडे आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
हवेलीतील नागरिकांना दिलासा
न्यायालयाच्या निर्णयानंतरही पुणे जिल्ह्यात फक्त हवेली तालुक्यातच जमिनीच्या खरेदी विक्रीची दस्तनोंदणी बंद होती. या पार्श्वभूमीवर हवेलीत 11 गुंठ्यांची खरेदीखत सुरु करण्यासाठी भाजपच्या वतीने पुण्यातील नोंदणी व मुद्रांक विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण गुरुवारी दिवसभऱ करण्यात आले. उपोषणादरम्यान हवेली तालुक्यात दस्तनोंदणी सुरु करण्याबाबत कार्यालयाचे अधिनस्त सर्व सह दुय्यम निबंधक यांची विशेष बैठक झाली. बैठकीत महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करणेबाबत अधिनियममध्ये नमुद प्रमाणभूत क्षेत्र बागायत जमिनीकरिता 11 गुंठे व जिरायत जमिनींसाठी 20 गुंठे वरील शेतजमिनींचे दस्त नोंदणीबाबत दस्तातील लिहून घेणार यांचे शेतकरी असल्याबाबतचे पुरावे घेऊन दस्त नोंदणी करण्याबाबत सूचना दिली आहे.