ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याच्या प्रकारात दौंड तालुक्यात वाढ
त्रिभूज शेळके
पारगाव – सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना अश्लील प्रलोभन दाखवून जवळीक साधली जात आहे. मग त्यांनी केलेल्या कृत्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ब्लॅकमेल करून लाखो रुपये उकळण्याचे प्रकार घडत आहेत. या हनी ट्रॅपच्या विळख्यात दौंड तालुक्यातील तरुणाई बेजार झाली आहे. मात्र समाजात बदनामी होईल, या उद्देशाने असे प्रकार उघडकीस येताना दिसत नाहीत. त्यामुळे तरुण मानसिक व शारीरिक छळ केल्याने आत्महत्येसारख्या टोकाचे पाऊल उचलण्याची भीती ग्रामीण भागात व्यक्त केली जात आहे.
दौंड तालुक्यात सध्या अनेक गावांतील तरुणांना असे मेसेज येत आहेत.
पारगाव येथील अनेक तरुणांच्या मोबाइलवर असे सुंदर मुलीचा प्रोफाइल असलेल्या अनोळखी नंबर वरुण रिक्वेस्ट येत आहेत. त्यातून लोभापोटी अनेक तरुण अर्थिक नुकसानीला बळी पडले आहेत. तर काही हुशार तरुणांनी त्यास रिप्लाय दिला नाही. परंतु काही तरूण हनी ट्रॅपचे महाजालात फसले असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. आता ग्रामीण भागाकडे या लोकांनी आपला मोर्चा वळविला असून,यांच्या अश्लील मायाजालात अनेक तरुण यात फसत आहेत. प्रोफाईलवर सुंदर मुलीचा फोटो असणारा अनोळखी क्रमांकावरून प्रथम मॅसेज येतो हाय तरुण मुले त्यास प्रतिसाद देतात. मग गप्पा चालू होतात.
थोड्याच अवधीत तरुण कधी त्यांच्या मोहजालात अडकतो, हे त्याचे त्यालाच कळत नाही. त्यानंतर फोटोची देवाण घेवाण होते, अश्लील न्यूड व्हीडिओ कॉल चालू होतो, तेथेच गफलत होते. अन त्या तरुणास ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रकार सुरू होते. समोरच्यांनी हे व्हिडिओ स्क्रीन रेकॉर्ड केलेले असतात. त्यानंतर सोशल मीडिया, मित्र, नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देऊन अवास्तव पैशांची मागणी केली जाते. जमेल तितकी रक्कम उकळण्याचा ते प्रयत्न केला जात आहे. त्या नंतर दुसरा फसवा कॉल येतो, मी क्राईम ब्रॅंचमधून बोलतोय, तुमच्याबद्दल एका मुलीने विनायभंगाची तक्रार दाखल केली आहे. त्यासाठी पोलिसांची गाडी तुमच्याकडे निघाली आहे.
मग तो तरुण गयावया करतो, यामुळे आपल्या इज्जतीला घाबरून तरुण त्यांच्या पैशाची मागणी पूर्ण करतात. आणि पैशाची पूर्तता जर नाही होऊ शकली तर आपली जीवन यात्रा संपवण्याच्या विवंचनेत गुरफटतात. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सऍप या सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना सावज केले जात आहे. ग्रामीण भागात हनी ट्रॅप बद्दलची जास्त माहिती नसल्याने त्या बद्दल तरुणांनी सावध राहण्याची गरज आहे. तरुणांनी कोणाच्याही मधाळ फोटोस किंवा संभाषणास बळी पडू नये यासाठी सावधानता बाळगण्याची गरज आहे.
सुंदर मुलींचा प्रोफाइल ठेऊन तरुणांची फसवणूक करण्याचे हनी ट्रॅपचे प्रकार वारंवार घडत आहेत. कोणीही अनोळखी व्यक्तीसोबत चॅट करू नये किंवा आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नये. जर कोणी वारंवार मेसेज करीत असेल तर त्या व्यक्तीस ब्लॉक करा. जर कोणी यात फसले असतील त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधावा.
– नारायण पवार, पोलीस निरीक्षक यवत पोलीस स्टेशन