नगर -दसऱ्यामुळे झेंडूच्या फुलांना मागणी वाढली आहे. नागरिक मोठ्या प्रमाणात फुलांची खरेदी करत आहेत. त्यामुळे फुलांचे भावही वाढले आहेत. शहरात सध्या एक किलो झेंडूच्या फुलांसाठी 80 ते 100 रुपये द्यावे लागत आहेत. दसरा सण बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. नागरिकांनी आदल्या दिवशीपासूनच सणाची तयारी सुरू केली आहे.
सर्वात आधी झेंडूच्या फुलांची खरेदी केली जात आहेत. शहरात चौकाचौकात झेंडूच्या फुलांची दुकाने दिसत आहेत. सणाच्या खरेदीसाठी बाजारपेठेतही गर्दी झाली होती. यावेळी लोकांनी झेंडू, शेवंती फुलांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. फुलांना मागणी वाढल्याने भाव वाढल्याचे दिसून आले. मंगळवारी एक किलो झेंडूच्या फुलांचे दर 80 ते 100 रुपयां दरम्यान होते. तसेच्या शेवंती फुलांसाठी साधारण 300 ते 400 रुपये द्यावे लागत होते. दसरा बुधवारी असल्याने फुलांच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.
सोमवारपासून फुलांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. नगर जिल्ह्याबाहेरूनही आवक होत आहे. यावेळी पावसाचा फटका बसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. जिल्ह्यात पडलेल्या अति पावसामुळे फुलांना मोठा फटका बसला आहे. फुलांचे नुकसान झाले आहे. आवकही कमी झाली आहे. त्यामुळे दर शंभर रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
किरकोळ बाजारात यापेक्षा जास्त दराने फुलांची विक्री होत आहे. शेवंती फुलासाठी 280 रुपये, गुलछडी 400 रुपये, शेवंती रतलाम 240 रुपये किलो असा दर आहेत. शहरातील बाजारपेठेत विविध प्रकारची फुले विक्रीसाठी आली आहेत. वाडिया पार्क, दिल्ली गेट, चितळे रोड, चौपाटी कारंजा, सर्जेपुरा, प्रोफेसर कॉलनी चौक, पाइपलाइन रोड, माळीवाडा, अशा विविध ठिकाणी फुलांची विक्री करण्यात येत होती. ग्राहकांचे प्राधान्य हे झेंडूची फुले खरेदी करण्याकडे होते. किरकोळ बाजारात एक किलो पिवळ्या रंगाच्या झेंडूच्या फुलांसाठी 80 ते 100 रुपये द्यावे लागत होते. झेंडूसोबतच शेवंतीच्या फुलांनासुद्धा चांगली मागणी होती. या फुलांसाठी मात्र ग्राहकांना एका किलोसाठी 300 ते 350 रुपये मोजावे लागत होते.