कामाची चौकशी करण्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी
मंचर – मंचरजवळील तांबडेमळा (ता.आंबेगाव) येथील शासकीय रुग्णालयाच्या बांधकामामध्ये वापरण्यात येणारे लोखंडी स्टील साहित्य निकृष्ट दर्जाचे असून त्या स्टीलला गंज लागलेला आहे. येथील कामाची चौकशी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर यांनी दिला.
शासकीय रुग्णालय आंबेगाव तालुक्यासाठी अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या कामासाठी वापरण्यात येणारे लोखंड संबंधित ठेकेदाराने गंजलेले आणले असून भविष्य काळामध्ये इमारतीला धोका पोहोचू शकतो. काही लोखंड चांगल्या दर्जाचे व काही लोखंड निकृष्ट दर्जाचे आणले असून निकृष्ट दर्जाचे काम करून जास्त नफा कमविण्याचा ठेकेदाराचा उद्देश असल्याचा आरोप सुरेश भोर यांनी केला आहे. संबंधित ठेकेदाराने फुटींगसाठी व्यवस्थित पीसीसी देखील केले नाही. ही बाब अतिशय गंभीर आहे,
एकंदर निकृष्ट दर्जाचे काम असल्याने रुग्णालयाची इमारत जास्त काळ टिकेल, असे वाटत नाही. यासंदर्भात कार्यकारी अभियंता आर. वाय पाटील, संबंधित शाखा अभियंता आघाव यांना कल्पना दिली असून ते याबाबत योग्य ती कार्यवाही करत नाहीत, टक्केवारीमुळे अधिकारी संबंधित ठेकेदारावर कारवाई करत नाहीत, असे निदर्शनास आले आहे.
या संदर्भात अधीक्षक अभियंता बी. एन. बहिर यांना भेटणार असून संबंधित काम बंद करून या कामासाठी वापरण्यात आलेले निकृष्ट दर्जाचे स्टील बदलून पुन्हा चांगले स्टील बसवावे. अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाप्रमुख सुरेश भोर यांनी दिली.
मंचरजवळील तांबडेमळा येथील शासकीय रुग्णालयाच्या बांधकामामध्ये वापरण्यात येणारे लोखंडी स्टील याची तपासणी करूनच वापरण्यात येत आहे. स्टील उघड्यावर पडले असल्याने गंज आल्यासारका रंग दिसतो. दर्जेदार काम होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे.
– आर. वाय. पाटील, कार्यकारी अभियंता, उत्तर विभाग पुणे.