बारामती तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे धूमशान : आज मतदान प्रक्रिया
डोर्लेवाडी – बारामती तालुक्यातील 32 ग्रामपंचायतीसाठी रविवारी (दि.4) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये अजित पवार यांचे गाव असलेल्या काटेवाडी गावची देखील ग्रामपंचायत निवडणूक लागलेली आहे. 32 कारभाऱ्यांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचे धूमशान होत. मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक प्रशासन सज्ज झाले आहे.
बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील ग्रामपंचायतीची निवडणूक लक्षवेधी ठरली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कुटुंबातील सर्वांचे मतदान या ठिकाणी आहे. त्यामुळे मतदानासाठी पवार कुटुंब हे उपस्थित राहणार का, याची उत्सुकता आहे. या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पॅनलसमोर भाजपने पॅनल उभा करून तगडे आव्हान दिले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री पवार यांच्या गटाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
डोर्लेवाडी, गुणवडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत देखील सत्ताधारी पॅनल आणि विरोधी पॅनल यांच्यात मोठी चुरस आहे. याठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने तयारी पूर्ण करण्यात आली आहे. बारामती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या वतीने ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी पूर्ण झालेली आहे. एसटी बसच्या माध्यमातून मतदान केंद्रावर पेट्या पोहोचवल्या आहेत.
बारामती तालुक्यातील 32 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी एकूण 135 मतदान केंद्र असणार आहेत. जवळपास 700 ते 750 कर्मचारी या निवडणूक केंद्रावर असणार आहेत, अशी माहिती निवडणूक अधिकरी गणेश शिंदे यांनी दिली आहे.