पुणे – पुणेकरांच्या आरोग्याची धुरा सांभाळणाऱ्या महापालिकेच्या आरोग्य विभागात फेरनियुक्त आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार आणि इतर अधिकाऱ्यांमध्ये सध्या शीतयुद्ध सुरू आहे. डॉ. पवार यांनी पदभार घेताच; सहायक आरोग्य अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या बदलल्या. तसेच दुसऱ्या दिवशी लगेच आरोग्य विभागाचा कोणताही पत्रव्यवहार आपल्या सहीशिवाय केला जाऊ नये, असे आदेश वैद्यकीय अधिकाऱ्यांना काढले.
तसेच यात, प्रशासकीय सुविधेसाठी क्षेत्रीय कार्यालये आणि परिमंडळाच्या पत्रव्यवहारासह सर्व प्रकारच्या निविदा, बिले देणे, खरेदीच्या प्रकरणांचा समावेश आहे. त्यामुळे आता सर्व अधिकार डॉ. पवार यांच्याकडे राहणार असल्याने आरोग्यच्या अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. महापालिका आरोग्य विभागाच्या माध्यमातून शहरातील सार्वजनिक आरोग्याची जबाबदारी सांभाळली जाते.
या विभागास अंदाजपत्रकात जवळपास 500 कोटी रुपयांचा निधी दिला जातो. त्यात, कामगारांच्या वेतनासह, औषध खरेदी, अंशदायी वैद्यकीय साहाय्य योजना, पालिका रूग्णालयांची देखभाल दुरुस्ती, स्मशानभूमी, जन्ममृत्यू संदर्भातील कामकाज, केंद्र व राज्य शासनाच्या योजना, अशा कामांचा समावेश असून आरोग्य प्रमुखांच्या नियंत्रणाखाली सहायक वैद्यकीय अधिकारी तसेच क्षेत्रीय कार्यालयस्तरावर क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी नेमले आहेत.
ते वेगवेगळे दाखले, परवाने देण्याचे काम करतात. तसेच ही कामे जलद गतीने व्हावीत, यासाठी या अधिकाऱ्यांना अधिकार दिले आहेत. मात्र, या पुढे या सर्व अधिकाऱ्यांनी कोणत्याही कामकाजावर आरोग्य प्रमुखांची सही घेणे बंधनकारक केले आहे.