जातेगाव बुद्रुक येथील श्री संभाजीराजे विद्या संकुलात संवाद
पाबळ – जातेगांव बुद्रुक (ता. शिरूर) येथे कासारी येथील आयोजित परिषदेसाठी आफ्रिका येथील देशातून आलेले विविध राजदूत यांनी शैक्षणिक माहितीसाठी मौजे जातेगाव बुद्रूक येथील श्री संभाजीराजे विद्या संकुलात भेट दिल्याने विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी राजदूत यांनी विद्यार्थ्याशी संवाद साधला.
भारत-आफ्रीका व्यावसायिक मार्गदर्शन बैठकीनिमित्त भारतीय शैक्षणिक व्यवस्था, कार्यपद्धती, शिक्षणातले बदलते नवप्रवाह व विद्यार्थ्यांशी हितगुज साधणेकामी पाच देशांतील राजदूत विद्यालयीन भेटीस आले होते. ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम यांच्या माध्यमातून हे राजदूत व विद्यार्थी शैक्षणिक भेटीचे आयोजन केले होते.
संस्थेचे सचिव व बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, प्राचार्य, डॉ. ललीत इंगवले, प्राचार्य रामदास थिटे, प्राध्यापक वृंदांनी पाहुण्यांचे स्वागत केले. आफ्रीका खंडातील जांबियाचे राजदूत मुस्तफा जावरा, रवांडा देशाचे मुकगिरा जॅकलीन, घानाचे अर्नेस्ट अडजेल, गेबॉनचे जोसेफ पॅट्रीका, नायजेरियाचे राजदूत आस अबदुलायी, ग्लोबल फोरम उद्योगसमूहाचे मुख्याधिकारी अभिषेक जोशी आदी मान्यवरांनी विद्यालयास भेट दिली.
याप्रसंगी राजदूतांनी भारतीय परंपरा, संस्कार, विद्यार्थी गुणवत्ता, शास्त्रीय संशोधन, विविध आंतरराष्ट्रीय सेवासंधीबाबत जिजामाता वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी खुला संवाद साधला. विद्यार्थी व शिक्षकांच्या शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्राचार्य रामदास थिटे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. गणेश बांगर यांनी केले. प्राचार्य डॉ. ललीत इंगवले यांनी आभार मानले.