पुणे – पुण्याचे पालकमंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे गेल्याने पुणे व पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर असून आपली कामे होणार नाहीत, अशी भिती या पदाधिकाऱ्यांना सतावित असतानाच; भाजपच्या पुण्यातील माजी नगरसेवकांना माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. “पुणे जिल्ह्याचे सहपालकमंत्रीपद मला मिळणार असून याबाबत पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. त्या मुळे काळजी करू नका.’ असा सल्ला पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
तसेच, लवकरच कोथरूड मध्ये आपले आणखी एक भव्य कार्यालय सुरू करणार असून त्या माध्यमातून तुमच्या समस्या सोडविल्या जातील असेही सांगितले आहे. शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी महापालिकेतील माजी नगरसेवक तसेच शहर पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी पाटील यांनीही उपस्थिती लावत सर्वांना मार्गदर्शन केले. मात्र, बहुतांश माजी नगरसेवकांनी या बैठकीकडे पाठ फिरविल्याचे पाहायला मिळाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच राज्यातील 11 नवीन पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली असून त्यात, पुण्याची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्याकडून काढून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यानंतर, भाजपच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. एका बाजूला पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता असताना तसेच महापालिका निवडणुका लांबल्याने प्रशासकीय कारभारामुळे नगरसेवकांना अडचणींचा सामना करावा लागत असताना भाजपचा पालकमंत्री नसल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांची कोंडी होण्याची भिती आहे. या पार्श्वभूमीवर पाटील यांच्याकडून सहपालकमंत्री पदाची मात्रा दाखवित नगरसेवकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.