मंचर – निरगुडसर (ता. आंबेगाव) येथे पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय आणि दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयातील दत्त मंदिरात भाविकांच्या उपस्थितीत टाळ मृदंगाच्या गजर, मंदिरात केलेली विविध रंगी फुलांची सजावट, ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’चे गजरात आणि फुलांची उधळण करण्यात आली . हभप भरत महाराज थोरात यांच्या प्रवचनाने श्री दत्त महाराज जन्मोत्सव उत्साहात पार पडला.
जन्मोत्सवानंतर फुलांचे वाटप, पाळणा, नाव ठेवणे, तसेच सुंठवडा वाटप हा कार्यक्रम झाला. यावेळी ‘अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त’ या जयघोषाने दत्त मंदिर दुमदुमले. यावेळी विद्यार्थांनी तयार केलेल्या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी निरगुडेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव वळसे पाटील,
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, बाळासाहेब घुले, डॉ. सदानंद राऊत, विष्णूकाका हिंगे, प्रमोद वळसे,
माजी सरपंच ऊर्मिला वळसे पाटील, उपसरपंच नितीन टाव्हरे, विद्यालयाचे प्राचार्य कांताराम टाव्हरे, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन रामदास वळसे पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. सुनील वळसे यांनी केले.