लोणीकंद : ज्यांच्या बलिदानाने मराठी माणसात जागृती निर्माण झाली, ज्यांनी मोघलांना सळो की पळो करून सोडले, अशा छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाला व बलिदान स्थळाला भव्य स्वरूप देण्यासाठी आज विविध विकासकामांचे भूमिपूजन होत आहे याचा मनस्वी आनंद आहे.
जोपर्यंत चंद्र व सूर्य आहेत तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य सर्वांनाच प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर हिंदवी स्वराज्य घशात घालण्याचे स्वप्न पाहणार्या औरंगजेबाची कबर याच महाराष्ट्रात बांधावी लागली हे छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे शूरवीर मावळे यांच्या कर्तृत्वाचे यश आहे, असे सांगून फडणवीस म्हणाले, ज्या काळात देशातील अनेक राजे रजवाडे औरंगजेबाला आणि मोगल सत्तेला शरण जात होते, त्यांचे मांडलिक होत होते त्या काळात प्राणाचे बलिदान देऊन छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षणासाठी लढत राहिले.
धर्म, संस्कृती, राजकारण, राज्यकारभार, अर्थकारण, समाज व्यवस्था यावर छत्रपती संभाजी महाराजांची मते अत्यंत परखड होती. राजाने नेमके काय काम केले पाहिजे हे सांगणारे छत्रपती संभाजी महाराज होते, त्यांचाच आदर्श घेऊन केंद्र व राज्य शासन काम करीत आहे, असे त्यांनी सांगितले.