पुणे – पुणे ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या प्रमुख डीलर हैदर शेख याने राज्यभरासह दिल्ली येथे ड्रग्ज पाठवल्याचे चाैकशीत निष्पन्न झाले आहे. ड्रग्ज विक्रीतून आलेले पैसे हैदरने हवालामार्फत दिल्लीला पाठविल्याची माहिती पुणे पोलिसांनी न्यायालयात दिली.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या हैदरसह आठ आरोपींची पोलीस कोठडीची मुदत शनिवारी संपत असल्याने त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमृत बिराजदार यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. यातील वैभव माने, अजय करोसिया, हैदर यांना ४ मार्चपर्यंत तर मकानदार, संदीप कुमार, संदीप यादव, दिवेश भूतानी, देवेंद्र यादव यांना ६ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
पुणे पाेलिसांनी उघडकीस आणलेले ड्रग्ज रॅकेट हे आंतराष्ट्रीय स्वरुपाचे ड्रग विक्री करणाऱ्या टाेळीचा भाग असल्याचे प्राथमिक चाैकशीत निष्पन्न झाले आहे. आतापर्यंत पाेलिसांनी एकूण ३ हजार ६७५ काेटी १३ लाख ६० हजार रुपयांचे एक हजार ८३७ किलाे ५६८ ग्रॅम एमडी जप्त केले आहे. आरोपींनी माेठ्या प्रमाणात ड्रगचे उत्पादन, साठा, वितरण केले असून हैदर शेख याने दिल्लीत त्याने हे पैसे विरेन सिंग, संदीप धुनिया यांना पाठविल्याचा संशय असून, त्याबाबत तपास करण्यात येत असल्याचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी सांगितले.
तर, आराेपींनी ड्रग्ज विक्रीच्या पैशांतून स्थावर किंवा जंगम मालमत्ता खरेदी केली आहे का? याबाबत देखील तपास करण्यात येत आहे. एमडी निर्मितीसाठी त्यांना काेणी अर्थसहाय्य केले, केमिकल काेठून आणले गेले याची चाैकशी देखील करण्यात येत आहे असल्याने त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील नीलिमा इथापे-यादव यांनी केली