पिरंगुटच्या मुकाईवाडीतील घटना : पोलीस अधीक्षकांकडून मदान केंद्राची पाहणी
पिरंगुट – मुकाईवाडी येथील मतदार यादीमध्ये बनावट विद्युत देयके, दस्त व इतर कागदपत्र ऑनलाइन सादर करून मतदार नोंदणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. जवळपास 1100 मतदारांची बनावट नोंद होणार होती; मात्र गुन्हा दाखल झाल्याने हा प्रयत्न हाणून पाडला आहे.
पिरंगुट मधील मुकाईवाडी येथे बनावट कागदपत्र सादर करून मतदार नोंदणी करणार्यांविरोधात पौड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी भेट देऊन पाहणी केली.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सध्या मुळशी तालुक्यातील प्रत्येक मतदान केंद्र पौड पोलिसांकडून तपासले जात आहे. यावेळी पोलिस पाटील स्वाती गोळे तसेच ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षकांना माहिती दिली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले, पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव आदी उपस्थित होते.
मुळशीचे तहसीलदार रणजित भोसले यांनी याबद्दल फिर्याद दाखल केली असून यामध्ये विजय मारणे (रा. टॉवर 5, फ्लॅट नं. 1003 ब्लू रिच टाऊनशिप, उरावडे), अमित गुलाब शिंदे (रा. मुकाईवाडी, पिरंगुट), भाऊसाहेब देविदास मोकर (रा. उभेवाडी, पिरंगुट), शकिल अहमद (रा. मतेवाडी, ता. मुळशी), महंमद अंसार आलम (रा. मतेवाडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
6 डिसेंबर 2023 पासून इरो नेट 2 या प्रणालीमध्ये ऑनलाइन पद्धतीने नमुना क्रमांक 6 हा अर्ज व त्यासोबत या गावचे रहिवासी नसलेल्या लोकांचे बनावट विद्युत देयके, बनावट दस्त व इतर बनावट कागदपत्रे आरोपींनी सादर केली होती. निवडणूक प्रक्रीयेमध्ये बनावट मतदान करण्याच्या हेतूने बनावट दस्ताच्या आधारे मतदान नोंदणी करण्याचा प्रयत्न केला असल्याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.