इंदापूर – राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकरांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. 12) इंदापूर तालुक्यातील रुई-बाबीर येथे त्यांच्या स्थानिक विकास निधीतून उभारण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याची टाकी व पाईप लाईनचा लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने इंदापूर तालुका रासपचा मेळावा रुई-बाबीर येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष किरण गोफणे यांनी दिली.
राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकरांच्या आमदार निधीतून रुई-बाबीर येथे कामे झाली आहेत. बाबीर देवस्थानाला मोठ्या प्रमाणात भाविक येतात. त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या उद्देशाने पाइपलाइन व 32 हजार लिटरची पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. त्याच्या लोकार्पणाचा सोहळा व रासपचा मेळावा रुई-बाबीर येथे होणार आहे.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अजित पाटील, युवक जिल्हाध्यक्ष स्वप्निल मेमाने, रासप नेते सतीश तरंगे, तालुकाध्यक्ष तानाजी मारकड, तालुका संघटक तानाजी शिंगाडे, युवक तालुका अध्यक्ष आकाश पवार, शैलेश थोरात, अविनाश मोहिते, अतुल शिंगाडे, सोन्या जानकर, तसेच तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.