सातारा – “स्मार्ट एक्स्पो ग्रुप’च्या व्यवस्थापनांतर्गत उदयनराजे भोसले मित्रसमूह, जय सोशल फौंडेशनच्यावतीने छत्रपती कृषी, औद्योगिक, वाहन व पशु पक्षी प्रदर्शन जिल्ह्यातील नागरिकांसाठी पर्वणी आहे, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
जिल्हा परिषद मैदानावर या महोत्सवाचे उदघाटन उदयनराजे भोसले यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, स्मार्ट एक्स्पोचे प्रमुख संयोजक सोमनाथ शेटे, जय सोशल फाउंडेशनचे सागर भोसले, जिल्हा कृषी अधीक्षक विजयकुमार राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी गुरुदास काळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अंकुश परिहार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे, कृषी विकास अधिकारी विजय माइणकर, प्रीतम कळसकर, माजी नगराध्यक्ष सौ. रंजना रावत, सौ. स्मिता घोडके, सौ. रेखा शेटे, माजी नगरसेवक कल्याण राक्षे, यांची प्रमुख उपस्थिती होती. तब्बल 225 हून अधिक स्टॉल असलेला हा महोत्सव पुढील पाच दिवस सातारकरांना एक पर्वणी ठरली आहे.
उदयनराजे भोसले म्हणाले, “”शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञानाची कमाल असलेला खते, औषधे स्प्रिंकलिंग करणारा स्वयंचलित ड्रोन या प्रदर्शन महोत्सवाचे आकर्षण आहे. हे प्रदर्शन मार्गदर्शक ठरेल व यातून आपल्याला नवनवीन विकास आणि तंत्रज्ञानाची ओळख होईल.’ डॉ. बुधाजीराव मुळीक म्हणाले, “”उदयनराजे यांच्या मार्गदर्शनाखाली भरलेले हे प्रदर्शन आता देशपातळीवर जाणे गरजेचे आहे. हे प्रदर्शन खऱ्या अर्थाने आगळेवेगळे आहे.’
सोमनाथ शेटे यांनी प्रास्ताविक केले. सोमनाथ शेटे, रेखा शेटे व हेमलता भोसले यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सूत्रसंचालन सुनील मोरे यांनी केले. छत्रपती कृषी महोत्सवांमध्ये रविवार दि. 9 रोजी सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत स्पेशल डॉग शोचे आयोजन करण्यात आले आहे.