खेड शिवापूर – शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांनी एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश केला असून, कोंडे आज सकाळी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबईला एकनाथ शिंदे यांना भेटायला गेले आहेत, त्यामुळे शिवसेनेला पुण्यातून आणखी मोठा धक्का बसला आहे. कोंडे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून एकनाथ शिंदे गटामध्ये गेल्याने खडकवासला मतदार संघामध्ये शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. रमेश कोंडे हे शिंदे गटामध्ये गेल्याने शिंदे गटाला पुण्यातून मोठी ताकद मिळाली आहे.
रमेश कोंडे हे पुण्यामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुखाचे काम पाहतात. पुण्यामध्ये त्यांचे शिवसेनेमध्ये वजन आहे. शेकडो कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहेत. एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडल्यावर त्यांच्या सोबतचे आमदार घेऊन त्यांनी भाजपबरोबर सत्ता स्थापन केली. त्यानंतर त्यांना मुख्यमंत्रिपद देखील मिळाले त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहायचं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटामध्ये जायचं यात रमेश कोंडे अडकले होते. त्यांचा निर्णयाकडे सर्व कार्यकर्त्यांचे लक्ष होते. अखेर कोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतला असून, सोमवारी (दि. 18) ते त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबईला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेले आहेत.
सरकारी यंत्रणांशी संलग्न राहणे गरजेचे
मी शिवसेनेवर नाराज नाही. मात्र पुढे जायचे असेल तर मतदार संघातील प्रश्न सोडवूनच जावे लागेल. यामध्ये अनधिकृत बांधकामे, सध्याच्या परिस्थितीत रजिस्ट्रेशन बंद, शिवगंगा खोऱ्याला गुंजवणीचे पाणी मिळवून देणे अशा अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सरकार असलेल्या यंत्रणांशी संलग्न राहणे गरजेचे आहे, असे रमेश कोंडे यांनी सांगितले.
गेली साडेसात वर्षे सत्तेत असताना हे प्रश्न का सोडविले गेले नाही? हा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी सांगितले की, सगळ्या सरकारमध्ये असताना आत्तापर्यंत रद्दी होईल एवढी पत्र दिलेली आहेत, परंतु त्या ठिकाणी असलेल्या यंत्रणांपर्यंत ती पोहोचली नाहीत त्यामुळे हजारो कुटुंबे अडचणीत आहेत. मी हाडाचा शिवसैनिक असून, शिवसेनेतच राहणार आहे. मुख्यमंत्री शिंदे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या व्यथा समजून निश्चितच प्रश्न सोडवतील म्हणूनच हा निर्णय घेतला आहे.
– रमेश कोंडे, पुणे जिल्हाप्रमुख, शिवसेना