पिंपरी – भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे आणि देशभक्तीची जाज्वल्य भावना कायम स्वरुपी जनमानसात राहावी, या उद्देशाने दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी हर घर तिरंगा उपक्रम देशभर राबविण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका तीन लाख कापड-पॉलिस्टरचे राष्ट्रध्वज विकत घेणार आहे. त्यासाठी महापालिकेने निविदा मागविल्या आहेत. 54 लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. हे राष्ट्रध्वज महापालिका शहरातील नागरिकांना आठही क्षेत्रीय कार्यालय परिसरात स्टॉल लावून विकणार आहे.
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दि.11 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे “हर घर तिरंगा” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात प्रत्येक नागरिकांच्या घरांवर तसेच सर्व शासकीय आणि निमशासकीय आस्थापना, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करण्यासाठी जाणीव जागृती कार्यक्रमाचे नियोजन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
देशभरात एकाचवेळी हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात येणार आहे. एकाच वेळी नागरिकांना राष्ट्रध्वज उपलब्ध होईल की नाही याबाबत शंका आहे. त्यामुळे महापालिकेच्या भांडार विभागाच्या वतीने शहरातील नागरिकांसाठी 3 लाख कापड-पॉलिस्टर राष्ट्रध्वज खरेदी करण्याचे प्रायोजन आहे. यासाठी पालिकेच्या वतीने उत्पादित कंपनी, विक्रते, वितरक, पुरवठाधारक यांच्याकडून ई-निविदा पध्दतीने निविदा मागविण्यात आली आहे. हे राष्ट्रध्वज रूंदी 20 इंच, उंची 30 इंच या साईजमध्ये असावेत, अशी अट निविदेमध्ये आहे. यासाठी 54 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. इच्छूक पुरवठाधारकांना 19 जुलैपर्यंत निविदा भरण्याची मुदत आहे.
केंद्र सरकारच्या आदेशामुळे महापालिका राष्ट्रध्वज खरेदी करून नागरिकांना विकणार आहे. सुरूवातीला महापालिकेलाही ध्वज विकत घेऊन नागरिकांना कसे विकायचे हा प्रश्न पडला होता. मात्र, ध्वज उपलब्ध करून द्या म्हणून सांगितले आहे, त्यानुसार पालिका तीन लाख राष्ट्रध्वज उपलब्ध करून देणार आहे, असे नाव न छापण्याच्या अटीवर महापालिकेतील एका रिष्ठ अधिकाऱ्यांने दै. प्रभातशी बोलताना सांगितले.