पुणे -पुणे विभागातील करोना बाधितांच्या संख्येने तब्बल चार लाखांचा टप्पा गाठला आहे. त्यामध्ये एकट्या पुणे जिल्ह्यात जवळपास पावणेतीन लाख बाधित आहेत. तर अन्य बाधित हे सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील आहेत. दुसरीकडे करोनामुक्तांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे मागील आठ दिवसांत करोनामुक्त होण्याचे प्रमाण दोन टक्क्यांनी वाढले आहे. तर मृत्यूचे प्रमाण कायम आहे.
विभागात आतापर्यंत 17 लाख 98 हजार 436 जणांची नमुने तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 4 लाख 9 हजार 377 जणांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला. बाधित सापडण्याचे प्रमाण 22.77 इतके आहे. बाधित संख्या चार लाखापर्यंत पोहोचली असली, तरी आतापर्यंत 3 लाख 21 हजार 393 बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. तर 77 हजार 251 बाधितांवर उपचार सुरू आहेत.
करोनामुळे एकूण 10 हजार 733 बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सर्वाधिक पुणे जिल्ह्यात 6 हजार 16 जणांचा मृत्यूंची नोंद झाली आहे. विभागात मृत्यूचे प्रमाण 2.62 टक्के तर बरे होणाऱ्यांचे प्रमाण 78.51 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.