दुरवस्था एकीकडे अन्‌ दुरुस्ती दुसरीकडेच

विडणी -फलटण तालुक्‍यातील विडणी गावातील रस्त्याची पावसामुळे मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. मात्र दुरवस्था झालेले प्रमुख रस्ते सोडून सत्ताधारी सदस्यांच्या घरी जाण्यासाठी असणाऱ्या शेतरस्त्यांवर मुरुम टाकण्याचा लाजीरवाणा प्रकार ग्रामपंचायत प्रशासनाकडून सुरु आहे. त्यामुळे गावातील ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. 

सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकांसह विडणी ग्रामपंचायतीचे सत्ताधारी सदस्य जनतेशी हुकुमशाही पध्दतीने वागत आहेत. याचा प्रत्यय सद्यस्थितीत गावातील रस्त्यांवर मुरूम टाकण्याचे कामावरून येत असल्याचा आरोप विडणी ग्रामस्थांमधून होत आहे. गावातील जनतेला ये जा करण्यासाठी आवश्‍यक असलेले प्रमुख रस्ते सोडून सत्ताधारी सदस्यांच्या घरी जाण्यासाठी असलेल्या, शेत रस्त्यावर मुरूम टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. तसेच सदरचे काम राजकीय फायदा विचारात घेवून केले जात आहे. जिथे मुरूम टाकला तिथे लोकं राहतात आणि जिथे मुरूम न टाकता काम बंद केले तिथे काय जनावरे राहतात काय? अशा संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहेत.

विडणी ग्रामपंचायतीची विद्यमान बॉडी येवून तीन वर्ष झाली. परंतु गावात एकही मोठे काम झाले नाही. तरीही विडणीच्या गाव पुढाऱ्यांची भाषणातून कोटींची उड्डाणे आणि सध्या पावसामुळे गावातील लोकांना रस्त्यावरून येणे जाणे मुश्‍किल झाल्यावर आणि कित्येक अर्ज दिल्यानंतर सरपंच आणि ग्रामसेवकाला जाग आली व रस्त्यावर मुरूम टाकण्याचे काम सुरू केले. आता हे काम कसे सुरू आहे. एक रस्ता अर्धवट ठेवून दुसरा रस्ता सुरू केला आहे.

मुरूम टाकण्याचे काम रितसर टेंडर काढून दिले असल्याचे समजते, आणि अशी मंजुरी दिलेली कामे राजकीय हेतूने प्रेरित होऊन बंद पाडली जात आहेत, अशा या हिटलरी आणि जुलमी कार्यपद्धतीचा व प्रवृत्तींचा जाहीर निषेध ग्रामस्थांमधून व्यक्त केला जात आहे. वास्तविक सध्या विडणी गावातील शेंडे वस्ती, इंगळे वस्तीवर सुरू असलेले रस्त्याचे काम कोणतीही मान्यता न घेता आणि निधीची तरतूद नसताना राजरोसपणे सुरु आहे. अशी मान्यता नसलेली कामे सुरू आहेत व रितसर मान्यता दिलेली कामे सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांच्याकडून बंद पाडण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.