बेडच्या माहितीसाठी दोन दिवसांत “डॅशबोर्ड’

जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही; सकारात्मक चर्चा झाल्याने मूक मोर्चा स्थगित

सातारा – जिल्हाधिकाऱ्यांसमवेत शुक्रवारी झालेल्या बैठकीत करोना नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याबरोबरच मागण्यांबाबत प्रशासनाने सकारात्मक दखल घेतल्याने सोमवारी काढण्यात येणारा मूक मोर्चा स्थगित केल्याची माहिती नगरसेवक अमोल मोहिते यांनी दिली. 

जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी किती बेड उपलब्ध आहेत, हे येत्या दोन दिवसांत डॅशबोर्डद्वारे प्रसिद्ध केले जाईल, त्याबाबतचे अपडेट प्रत्येक दोन तासाला देण्यात येतील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी यावेळी दिली.

करोनाच्या परिस्थितीत प्रशासनाची अयोग्य कार्यपध्दती, ऑक्‍सिजन बेड उपलब्ध करा, हॉस्पिटलची यंत्रणा कार्यान्वित करा, 1077 सक्षम करा, जम्बो हॉस्पिटलचा कार्यक्रम द्या, सरसकट बिलांची तपासणी करा, या मागण्यांसाठी नगरसेवक अमोल मोहिते यांनी जिल्हा प्रशासनाविरोधात मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. मात्र, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी अमोल मोहिते यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, कोव्हिड डिफेंडर्स ग्रुपचे विनित पाटील, शरद काटकर, हरीष पाटणे, विनोद कुलकर्णी, प्रशांत मोदी, तुषार तपासे, ओंकार कदम उपस्थित होते. अमोल मोहिते व कोव्हिड डिफेंडर्स ग्रुपने विविध मागण्या व नागरिकांमधून होत असलेल्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.

प्लाझ्माचा तुटवडा भासू नये म्हणून सातारा सिव्हिलबरोबरच आणखीन चार ठिकाणी प्लाझ्मा बॅंक्‍सना परवानगी देण्यात येणार आहे. प्रत्येक रूग्णाच्या केसपेपरवर ब्लड ग्रूप टाकण्यात येणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात जम्बो कोव्हिड हॉस्पिटल सुरू होईल. त्यानंतर कोव्हिडबाबतचा ताण कमी होईल, असे श्री. सिंह यांनी सांगितले.

याशिवाय जिल्हा क्रीडा संकुलात आणखी एक कोव्हिड हॉस्पिटल उभे करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी 10 हजार रेमडेसिवीर इंजेक्‍शनची ऑर्डर दिली आहे. खासगी रूग्णालयांनाही मागणीनुसार पुरवठा लवकरच करणार आहे, असेही त्यांनी बैठकीत सांगितले. गर्भवती महिलांसाठी विशेष काळजी घेतली जाणार असून त्यासाठी एक मेकॅनिझम ठरवून विशेष आदेश काढले जातील.

याबरोबरच खासगी रुग्णालयाकडून इंजेक्‍शनची थकबाकी वसूल करतानाच यापुढे प्रत्येक रुग्णालयाच्या बाहेर महात्मा फुले योजनेचा बोर्ड, सरकारने ठरवून दिलेल्या कोट्यामध्येच रुग्ण दाखल करून घेणे, जादा बिलाची आकारणी करणाऱ्या रूग्णालयांवर कडक कारवाई करणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठकीत मागण्यांच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. काही चांगले निर्णय बैठकीत झाले. त्याची अंमलबजावणी होईल याची खात्री वाटत असल्याने सोमवारी पुकारलेला मूक मोर्चा तूर्त स्थगित करत आहे, असे मोहिते यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.