पुणे – रेल्वेच्या विविध कामांसाठी पुणे स्टेशन दररोज चार-पाच तास बंद राहणार, अशी माहिती सोमवारी व्हायरल झाली होती. दरम्यान, या प्रकरणाचे रेल्वे प्रशासनाकडून खंडन करण्यात आले आहे. त्यामुळे पुणे स्टेशन सुरूच राहणार आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
“प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाच्या कामामुळे दररोज चार-पाच तास पुणे स्टेशन बंद राहून लांब पल्ल्याच्या ट्रेन्स खोळंबण्याची शक्यता आहे,’ अशा प्रकारची माहिती विविध सोशल माध्यमांवर व्हायरल झाली होती. यावर सुट्यांच्या हंगामात प्रवाशांचा खोळंबा होण्याच्या शक्यतेने या निर्णयावर नाराजी व्यक्त करण्यात आली. शिवाय, संबंधित माहितीमध्ये स्थानक बंद राहण्याचे वेळापत्रक, कधीपासून ते बंद राहणार याबाबत कोणतीही माहिती नव्हती.
त्यामुळे गोंधळाचे वातावरण होते. हे लक्षात घेता सदरील प्रतिनिधीने मध्य रेल्वेचे पुणे विभाग जनसंपर्क अधिकारी अजयकुमार यांच्याशी संपर्क साधत या माहितीबाबत विचारणा केली. त्यावर त्यांनी पुणे रेल्वे स्थानक बंद राहणार असल्याची संबंधित व्हायरल माहिती पूर्णपणे खोडसाळपणाची असून, ती निराधार असल्याचे सांगितले.
संपूर्ण पुणे स्टेशन चार-पाच तास बंद राहण्याची माहिती निराधार आहे. याउलट प्रवाशांसाठी आम्ही नव्या ट्रेन सुरू करणार आहोत. त्यामुळे स्टेशन बंद करण्याचा प्रश्नच नाही, असे अजय कुमार (जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे पुणे) म्हणाले.