पिरंगुट -सध्या ऑनलाइन वर्ग सुरू झाले आहे. मात्र, एखादे पुस्तक पाहिजे असेल तर विद्यार्थी ग्रंथालयात जाऊ शकत नाही. ही गरज पुण्याजवळील लवळे येथील भारती विद्यापीठाच्या इंजिनिअरिंग कॉलेजने ओळखली आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे आयआयटी खरगपूरच्या नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया (एनडीएलआय) बरोबर ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून घेतले.
या माध्यमातून महाविद्यालयातील 862 विद्यार्थ्यांना, शिक्षक आणि नॉन-टिचिंग स्टाफना ही लायब्ररी खुली झाली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांची क्रमिक आणि संदर्भ पुस्तके उपलब्ध झाली आहेत. प्रा. ज्योती ढाणके यांनी प्राचार्य डॉ. आर. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम केले. एनडीएलआय लायब्ररीचा वापर करण्यासाठी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना आव्हान केले आहे.
डिजिटल साहित्य, ई-पुस्तके, ऑडिओ बुक, व्याख्यानमाला, सिम्युलेशन साधने, थीसिस, अहवाल, लेख, जर्नल्स, प्रश्नपत्रिका अशा विविध प्रकारची एकूण 11 भाषांमध्ये 5 कोटीहून अधिक संसाधने येथे उपलब्ध आहेत. जेईईचा अभ्यास करणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी देखील संसाधने उपलब्ध आहेत, असे प्रा. ज्योती ढाणके यांनी सांगितले.
याविषयी संगणक विभागाच्या तृतीय वर्षाचा विद्यार्थी संस्कार म्हस्के म्हणाला, एनडीएलआयमुळे लॉकडाऊन सुरू असतानासुद्धा पुस्तकांची कमतरता भासली नाही, तसेच अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतरही पुस्तकांचे वाचन करता आले. ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यामुळे मला सर्व पुस्तके उपलब्ध झाली. त्यामुळे अभ्यासाला गती मिळाली आणि स्टडी मटेरियल शोधण्याचा वेळ वाचला, असे द्वितिय वर्षाचा विद्यार्थी पुष्कराज वेर्णेकर यांनी सांगितले.
तृतीय वर्षाची विद्यार्थिनी महिमा नाईक हिने सांगितले की, “एनडीएलआय’मुळे तांत्रिक क्षेत्रात बरीच पुस्तके आणि नियतकालिकांमध्ये ऑनलाइन प्रवेश मिळाल्याने लायब्ररी वापरण्यास खूप मदत झाली. यामुळे चालू असलेल्या संशोधनास मदत मिळाली, तसेच ऑनलाइन व्याख्यानांच्या माध्यमातून अनेक शंका स्पष्ट होण्यास मदत मिळाली.