आढळराव पाटील ः एटीसीए मैदानावर क्रिकेट लीगचे आयोजन
मंचर – राज्यातील ग्रामीण भागातील खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची संधी प्राप्त व्हावी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी या स्पर्धेच्या युगात कुठेही कमी पडू नये, या हेतूने राष्ट्रीय दर्जाच्या एटीसीए मैदानावर क्रिकेट लीगचे आयोजन केल्याची माहिती माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
आंबेगाव तालुका क्रिकेट असोसिएशन व श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आंबेगाव तालुक्यातील पहिल्या एटीसीए प्रीमियर लीग एटीसीए क्रिकेट स्टेडियम, लांडेवाडी येथे यशस्वीरीत्या पार पडल्या. स्पर्धेचे उदघाट्न माजी खासदार व भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील विविध शाळांच्या संघांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक घोडेगावच्या आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ या संघाने पटकाविला, तर जुन्नरचे रेडियन्स इंटरनॅशनल स्कूल द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले, तृतीय क्रमांक एस. एन. इंग्लिश मीडियम स्कूल, खेड या संघाने मिळविला.
ग्रामीण भागातील होतकरू खेळाडूंना आम्ही उत्तम दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उपलब्ध करून देत असून, खेळाडूंनी या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आले. भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी शामल चौधरी व न्यू इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या शबनम मोमीन यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. स्पर्धेचे नियोजन न्यू इंग्लिश स्कूल, लांडेवाडी शाळेचे क्रीडा शिक्षक ऋषीकेश खोमणे, देवा मटाले, तेजश्री शिंदे व तुषार काळे यांनी केले. सूत्रसंचालन व समालोचन महादेव गायकवाड यांनी केले.