एम. डी. पाखरे/ज्ञानेश्वर फड
आळंदी :
अल्याड पल्याड पताकांचे भार ।
मध्यें मनोहर इंद्रायणी ॥
पिवळ्या पारब्या आणिक हिरव्या ।
नीळवर्ण सार्या लखलखित ॥
जरी जर्तारी झाल्या रानभरी ।
विजा त्यावरी खेळताती ॥
सर्पाकार दंड तारांगणावाणी ।
पताका तिकोनी दाटताती ॥
नामा म्हणे तेथें पताकांचे भार ।
केव्हडें भाग्य थोर ज्ञानोबाचें ॥
खांद्यावर वारकरी पताका, गळ्यात टाळ, वीणा, मृदंग, मुखी हरीनाम… महिलांच्या डोक्यावर तुळशी अशा वारकर्यांच्या शेकडो दिंड्या गेली दोन दिवसांपासून आळंदीत दाखल होत आहेत. आळंदीत येताच नगरप्रदक्षिणा करून वारकरी भाविक आपल्या मुक्कामी पोहचत आहेत. पंचक्रोशीत हरीनामाचा गजर सुरु असून भक्तिमय वातावरण आहे. सर्वत्र ज्ञानदान, अन्नदान सुरु आहे. माऊलींच्या समाधी दर्शनाची दर्शनबारी इंद्रायणी घाटाच्या पलीकडे गेली आहे. तीर्थक्षेत्र आळंदीत सुरू असलेला श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी वारी सोहळा आता चांगलाच रंगला आहे. शनिवारी (दि. 9) कार्तिकी एकादशी तर सोमवारी (दि.11) समाधी सोहळा आहे.
या सोहळ्यासाठी देश -राज्याच्या कानाकोपर्यातून हजारो भाविक आळंदीत दाखल झाले आहेत. मुख्य यात्रा शनिवारी असल्याने शुक्रवारी आणि शनिवारी 5 लाखांपेक्षा जास्त भाविक आळंदीत दाखल होण्याची शक्यता आहे. खरेतर माऊलींचा हा समाधी सोहळा 8 दिवस असतो मात्र बहुतांश भाविक हे दशमी आणि एकादशीच्या दिवशी येत असतात.
पासधारकांना रात्री 12 वाजता प्रवेश
शनिवार (दि. 9) रोजी कार्तिक वद्य एकादशी मुख्य पूजा होणार आहे. एकादशीचे दिवशी पहाटपूजेसाठी निमंत्रितांना शुक्रवारी (दि. 8) रात्री 12 वाजता हनुमान दरवाजातून मंदिरात प्रवेश देण्यात येईल. तसेच शनिवारी (दि. 9) पहाटे 2 ते 3 व दुपारी 2 ते 6 या वेळेत पासधारकांना हरिहरेंद्रस्वामी मठाजवळील जिन्यावरून मंदिरात प्रवेश देण्यात येईल, अशी माहिती माऊली देवस्थानकडून देण्यात आली.
इंद्रायणी घाट वारकर्यांनी फुलला –
माउलींच्या समाधी सोहळ्यासाठी आळंदीला आलेल्या भाविकांची संख्या आता लाखावर पोहोचली आहे. इंद्रायणी तीरी अंघोळीसाठी पहाटेपासून भाविकांची लगबग असते. दिवसभर भाविक घाटावर ये-जा करत असतात. तसेच घाटावर विश्व शांती केंद्र या ठिकाणी दिवसभर भजन, कीर्तन, प्रवचन असे विविध वारकरी संप्रदायिक कार्यक्रम सुरु आहेत. हे कार्यक्रम ऐकण्यासाठीही भाविक घाटावर येतात. अनेक भाविक घाटावरच मुक्काम करतात त्यामुळे 24 तास घाटावर भाविकांची गर्दी दिसून येत आहे. या ठिकाणी भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
आज माऊली मंदिरात होणारे कार्यक्रम –
कार्तिक वद्य दशमी (स्मार्त एकादशी) शुक्रवारी (दि. 8) पहाटे 3 ते 5 पवमान अभिषेक व दुधारती, सकाळी 5 ते 11.30 श्रींच्या चलपादुकांवर भाविकांच्या महापूजा, दुपारी 12. 30 ते 1 महानैवेद्य, सायंकाळी 4.30 ते 6.30 वीणा मंडपामध्ये गंगुकाका शिरवळकर यांच्यातर्फे कीर्तन सेवा, 6. 30 ते 8.30 वाजता धोंडोपंत दादा अत्रे यांच्यातर्फे कीर्तन सेवा, रात्री 8.30 ते 9 धुपारती, रात्री 9 ते 11 वीणा मंडपात वासकर महाराज यांच्या तर्फे कीर्तन सेवा पार पडणार आहे. रात्री 11. 30 ते 12. 30 वीणा मंडपात वाल्हेकर महाराज यांचेतर्फे जागर.