पुणे, दि. 3 -पुणे जिल्हा नियोजन समितीमधील (डीपीडीसी) 303 कोटींच्या कामांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी मंजुरी दिली. त्यामुळे मागील तीन महिन्यांपासून स्थगित असलेली विकासकामे सरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, कामाचे वाटप करताना भाजप आमदार, शिवसेनेचे कार्यकर्ते आणि विरोधी पक्षातील आमदार नाराज होणार नाहीत, असा समतोल राखण्यात आला आहे. अजित पवार अस्वस्थ होतील, रागावतील, नाराजी व्यक्त करतील, अशा कामांना कात्री लावण्यात आलेली नाही, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीनंतर पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
“जिल्ह्याच्या विकासकामांना खीळ बसली होती, ती दूर होण्यास मदत होणार आहे. पहिल्या टप्प्यात 303 कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली असून, त्यात 4 हजार 300 कामांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील रस्ते, स्मशानभूमी, चावडी, शाळा इमारत, शहरातील दलित वस्ती, आदिवासी भागातील रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात सहा ऑक्टोबर रोजी आणखी 200 कोटींच्या कामांना मंजुरी दिली जाणार आहे. कामांना मंजुरी लवकर द्यावी लागेल, तरच 31 मार्च 2023 पूर्वी कामे होती. जिल्हा परिषदेच्या कामांना दोन वर्षांची मुदत असते. परंतु इतर विभागामार्फत केल्या जाणाऱ्या कामांना एक वर्षाची मुदत असते. त्यामुळे लवकर ही प्रक्रिया राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत,” असे पाटील यांनी सांगितले.
समतोल राखत कामे मंजूर
कामांना किती प्रमाणात कात्री लावली आहे, या प्रश्नावर पालकमंत्री पाटील म्हणाले, कामाची यादी पाहिल्यानंतर सर्व आमदारांना आनंदाचा धक्का बसेल, आम्ही विकासाचे राजकारण केले आहे, विरोधी आमदारांनीही सार्वजनिक कामे सुचवलेली आहेत. त्यामुळे समतोल राखत कामे मंजूर केले जात आहेत.