शिक्रापूर – शिवतक्रार म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील पोलिसांत तक्रार केल्याचा राग मनात धरून एकाने तक्रारदाराच्या घरी जाऊन त्याला बेदम मारहाण करून जखमी केले. यावेळी दुचाकीचे नुकसान केल्याची घटना घडली. महेश पोपट शिवले, असे जखमीचे नाव आहे.
याप्रकरणी शिवाजी सोनबा शिवले यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिवतक्रार म्हाळुंगी येथील महेश शिवले यांनी शिवाजी शिवले यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली होती.
त्यानंतर (दि.24) शिवाजी शिवले हा दुचाकीवरून महेश शिवले यांच्या घरासमोर येऊन महेश यांच्या घरात आला. महेश यांना तू पोलिसांत तक्रार का केली, आता तुला सोडणार नाही, असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी करीत घरातून बाहेर आणले.
दगडाने मारहाण करून जखमी केले. यात महेश पोपट शिवले हे जखमी झाले आहेत. याबाबत मोहिनी महेश शिवले (वय 33, रा. शिवतक्रार म्हाळुंगी, ता. शिरुर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमोल चव्हाण करीत आहेत.