नीरेत बुवासाहेबांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक
नीरा – एकीकडे नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करत तरुणाई दारू, बिअर, व्हिस्की आणि रम घेत नववर्षाचे स्वागत करण्याच्या पद्धत रूढ होत आहे.
या पद्धतीला फाटा देत नीरा (ता.पुरंदर) येथील बुवासाहेब मित्र मंडळाच्या तरुणांनी बुवासाहेब मंदिराची स्वच्छता करत नववर्षाचे स्वागत केले. रस्त्याच्या कडेची स्वच्छता करत स्वच्छ भारत अभियानाला पाठिंबा दिला. ज्येष्ठांसाठी रात्री भजन कीर्तनाचे आयोजन करत मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. नववर्षाच्या स्वागताला दारू नको तर दूध प्या असा संदेश देत तरुणांनी अनोख्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत केले.
नीरा येथील बुवासाहेब तरुण मंडळाचे अध्यक्ष व उपसरपंच राजेश काकडे यांनी 16 वर्षांपूर्वी बुवासाहेब मंदिराच्या स्थापना दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले होते. तेव्हापासून स्थापना दिवस हा तिथीप्रमाणे साजरा न करता इंग्रजी तारखे प्रमाणे करण्याचे नियोजन करण्यात आले. एक जानेवारी हा स्थापना दिन असल्याने या पूर्वसंध्येला विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान, सोमवारी (दि. 1) सकाळी बुवासाहेबांच्या प्रतिमेची पालखीतून सहवाद्य मिरवणूक काढण्यात आली. उत्सव मूर्तींना नीरा नदीच्या तीर्थात स्नान घालण्यात आले. ग्रामप्रदक्षीणे दरम्यान महिलांनी मोठ्या श्रद्धेने ओक्षवंत केले. दुपारी महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. दोन दिवस चालणार्या या उत्सवात युवकांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती.
नीरेच्या सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, माजी उपसरपंच दीपक काकडे, सदस्या सारिका काकडे, प्रियंका झुंजरे, अनंता शिंदे, अभिषेक भालेराव उपस्थित होते. बुवासाहेब तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले.