ओबीसींना आरक्षण लागू केल्याने इच्छुक जोमात
भाऊ ठाकूर
राहू – राज्यामध्ये अनेक दिवस चर्चिलेला राजकीय विषय म्हणजे ओबीसी आरक्षण होय. जेव्हापासून ओबीसी आरक्षणाला स्थगिती आली होती, तेव्हापासून अनेक ओबीसी संघटनांनी मोर्चे, आंदोलनाचा पावित्रा घेतलेला होता. तत्कालीन महाविकास आघाडीच्या सरकारनेदेखील या संदर्भात अनेक प्रयत्न केल; परंतु न्यायालयाच्या निकालाने हा विषय आता बाजूला पडून पुन्हा काही नियम पाळून ओबीसी आरक्षणाबरोबर पुढील सर्व निवडणुका या होणार आहेत, त्यामुळे राहू-खामगाव जिल्हा-परिषद गटात ओबीसी समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
राहू-खामगाव जिल्हा-परिषद गटात ओबीसी समाजाच्या बाजुच्या निर्णय प्रकर्षाने जाणवणार आहे. नवीन झालेल्या संरचनेमध्ये गटाचे नाव तेच राहिले; परंतु हवेली तालुक्यातील अनेक गावे ही पुणे महानगरपालिकेत गेल्यामुळे त्याचा परिणाम होऊन दौंड तालुक्यामध्ये जिल्हा-परिषद गटाच्या संख्येमध्ये दोन वाढ झाली, त्यामुळे लोकसंख्येच्या निकषानुसार राहू-खामगाव जिल्हा-परिषद गटातील बऱ्याच गावांची गण बदली झाली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम थेट उमेदवार निवडीवर किंवा तिकीट जाहीर करण्यावर झाला आहे.
दौंड तालुक्यात कोणत्या गटात किंवा गणात ओबीसी किंवा इतर आरक्षण पडतील तो भाग वेगळा आहे; परंतु राहू-खामगाव गटामध्ये मराठा समाजा पाठोपाठ माळी व धनगर समाजाचे चांगले प्रभुत्व आहे, त्यामुळे या समाजाला त्या प्रमाणात सर्वच पक्षांकडून न्याय मिळणे अपेक्षित आहे; परंतु यामध्ये बऱ्याच वर्षांपासून इतर समाजांबरोबर धनगर समाजावर अन्याय झाला आहे. मागील साधारण 20 वर्षे ओबीसी समाजाला जागा मिळाल्या; परंतु त्यात धनगर समाजाला संधी मिळू शकली नाही, किंवा संधी मिळाली तर पराभवामुळे नेतृत्व करता आले नाही. त्यामुळे होऊ घातलेल्या जिल्हा-परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये धनगर समाज पूर्ण ताकतीने उतरणार यात काही शंका नाही, मग ती संधी कोणत्याही गटाकडून मिळो.
खामगाव गण कुल गटास अवघड?
राहू-खामगाव गट हा तसा आमदार कूल यांचा बालेकिल्ला असला तरी या गटातील खामगाव गणात त्यांना यश येत नाही. राहू गट व राहू गण मात्र कायम आमदार कुलांच्या पाठीमाघे उभा असतो; परंतु नवीन झालेल्या रचनेचा अभ्यास केला तर खामगाव गणात देखील आमदार कूल समर्थकांचे प्राबल्य असलेल्या गावांचा समावेश झालेला आहे, त्यामुळे खामगाव गणात यावेळेस कदाचित इतिहासाची पुनरावृत्ती टळू शकते. पानवली, टाकळी भीमा, मगरवाडी सारखी गावे ही निर्णायक मतदान आमदार कुल यांच्या पारड्यात टाकू शकतात, म्हणजेच यावेळेस खामगाव गणात देखील काटे की टक्कर आपणाला पाहायला मिळू शकते.