शिरूरमध्ये नदीपात्रातील अनोळखी मृतदेहाचे गूढ उकलले
लोणी काळभोर – पाचर्णे मळा, शिरुर परिसरातील घोडनदीपात्रात 31 जानेवारी 2024 रोजी आढळून आलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून, खुनाचे गूढ उकलून तीन आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलिसांना यश आले आहे. ’जमीन विक्री करा’ म्हणून भांडण करत असल्याने सख्खा भाऊ व चुलत्याने हा खून केल्याची बाब पोलिसांच्या तपासात उघडकीस आली आहे.
कृष्णा गोकुळ विघ्ने (वय 32, रा. आनंदगाव, ता. शिरूर कासार, जि. बीड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहेत. तर अजिनाथ गोकूळ विघ्ने (वय 26), पांडुरंग अर्जुन विघ्ने (वय 50, दोघे रा. आनंद गाव), गणेश प्रभाकर नागरगोजे (वय 29, रा. एकलवाडी, ता. पाटोदा, जि. बीड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षकअविनाश शिळीमकर यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली. रामभाऊ पाचर्णे यांच्या शेताजवळ असलेल्या नदीपात्रात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह हातपाय बांधलेल्या स्थितीत आढळून आला होता. मृतदेह नदीपात्रातील पाण्यात आढळल्याने चेहर्यावरून ओळख पटविणे अवघड होते; परंतु स्थानिक गुन्हे पथकाने मृतदेहाची ओळख पटवली.
तपासात मृताचे नाव कृष्णा विघ्ने असल्याचे निष्पन्न झाले. मृत कृष्णा विघ्ने याचा भाऊ अजिनाथ गोकूळ विघ्ने, चुलता पांडुरंग विघ्ने व गणेश नागरगोजे यांनी हा खून केला अशी माहिती गोपनीय खब-याकडून मिळाली. या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी वरील तिन्ही आरोपींना शिरूर कासार येथे सापळा रचून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
तिन्ही आरोपी पोलीस कोठडीत
तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपींनी गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली. मृत कृष्णा हा व्यसनी होता. तो ’कुटुंबात जमीन विक्री करा, ’ असे म्हणून भांडण करत असे. या कारणास्तव आरोपींनी त्याचा खून केल्याचे कारण तपासात पुढे आले आहे. तिन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक यादव करत आहेत.