पुणे – पोलिसांनी जमिनीच्या व्यवहारात सेटलमेंट केल्यास थेट निलंबनाला सोमोरे जावे लागेल, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. लोणीकंद येथील जमिनीच्या एका प्रकरणात त्यांनी हा प्रयत्न हाणून पाडला असून, दोन्ही बाजूच्या व्यक्तींच्या तक्रारी दाखल करून घेतल्या. त्यामुळे बांधकाम व्यवसायिक आणि इस्टेट एजटांना हाताशी धरणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. हा इशारा देताना त्यांनी म्हटले की, तुम्हाला आगीशी खेळायचा शौक असेल तर खुशाल खेळा, मात्र त्याचे परिणाम अतिशय वाईट असतील.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारल्यावर मागील काही दिवस बैठकांचा धडाका लावला आहे. त्यांनी पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हद्दीतील सर्व अवैध धंदे तातडीने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हे धंदे सुरु असल्याची माहिती मिळाल्यास थेट सर्जिकल स्ट्राईक करण्यात येईल, तसेच यास पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यास जबाबदार धरून त्याच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. त्यानुसार सर्व अधिकारी कामाला लागले असून, हद्दीतील धंदे बंद ठेवण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले आहेत.
दरम्यान, पुणे शहराच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. येथील जमिनींना सोन्याचा भाव मिळत आहे. त्यामुळे जमिनीवर ताबा मिळवणे, बळकावणे, मालकाला धमकावून जबरदस्तीने जमीन विक्री करण्यास भाग पाडणे, असे प्रकार घडत आहेत. यासाठी रीतसर पोलिसांची मदत घेतली जात असल्याची बाब अमितेश कुमार यांच्या कानावर आली होती. त्यानुसार त्यांनी पोलिसांना जमिनीच्या व्यवहारात सेटलमेंट न करण्याचा इशारा दिला आहे. दोन्ही बाजू ऐकून तक्रार दाखल करून घेण्याचे आदेश दिले आहेत.
शहरातील पब मालकांची परेड
शहरातील बड्या पब मालकांना पोलीस आयुक्तालयात बोलवण्यात आले होते. त्यांना शासनाचे सर्व नियम पाळण्याचे आदेश देण्यात आले. पब वेळेवर बंद न झाल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असे स्पष्ट करण्यात आले. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत पब नियम पाळणार नाहीत, तेथील पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारला जाईल, तसेच त्यांना कारवाईलाही सामोरे जावे लागेल असे अमितेश कुमार यांनी सांगितले. तडपारीचा भंग आणि मोक्का व इतर गुन्ह्यांतून जामिनावर आलेल्या गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
तंबीनंतरही कर्मचाऱ्यांचे धंदे सुरूच
आयुक्तांनी तंबी दिल्यानंतर बहुतांश पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धंदे तातडीने बंद करण्यात आले आहेत. मात्र, जेथे पोलीस कर्मचारीच भागीदार आहेत, तेथील धंदे मात्र संरक्षणात सुरू आहेत. बंडगार्डन, स्वारगेट , मार्केट यार्ड, वारजे, डेक्कन परिसरातील कर्मचाऱ्यांनी मात्र वरिष्ठांच्या डोळ्यांत धूळ चारत अशा धद्यांचा आश्रय दिल्याचे चित्र आहे.