मंचर – सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असून, पुढील दहा-बारा दिवसांत सरकारने दूध दराबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा मुंबईत येऊन आंदोलन करुन सरकारला सळो की पळू करून सोडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी दिला आहे.
सरकारने दुधाचे बाजारभाव कमी केल्याच्या निषेधार्थ पिंपळगाव खडकी (ता. आंबेगाव) येथील श्रीराम दूध संस्थेसमोर शांततेच्या मार्गांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले. यावेळी वनाजी बांगर संतोष गावडे, प्रकाश कोळेकर, संजय पालेकर, संतोष पवार, तुकाराम गावडे, धोंडीभाऊ गावडे, अंकुश गावडे, सुदाम पोखरकर, पोपट गावडे, अभिलाष घेवारी, श्रीकांत पोखरकर, मंगेश बांगर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
यावेळी प्रभाकर बांगर म्हणाले, जुलै महिन्यामध्ये राज्य सरकारच्या वतीने दुधाच्या दराचा आढावा घेण्यासाठी शासन निर्णय पारित करण्यात आला होता. त्यावेळी सरकारने समिती स्थापन केली होती. या शासन निर्णयाचा तीन महिन्यांनी आढावा घेतला जाणार होता; परंतु आजपर्यंत पाचवा महिना चालू झाला, तरी देखील शासनाने या निर्णयाचा आढावा घेतलेला नाही. खासगी व सहकारी दूध संघांनी दुधाचे दर मोठ्या प्रमाणात कमी करण्यास सुरुवात केली आहे.
जिल्हा दूध संघाने 3.5 फॅट आणि ८.५ एसएनएफला 26 रुपये प्रतिलिटर दर जाहीर केला आहे. खासगी संघांनी देखील कमी झालेल्या प्रत्येक पॉईंटला मोठ्या प्रमाणात कपात करून शेतकऱ्यांची लूट सुरू केली आहे. राज्य सरकार या सर्व गोष्टींकडे बघ्याची भूमिका घेत आहे. सरकारने तातडीने यामध्ये लक्ष घालून 34 रुपये शासन निर्णयाप्रमाणे दर शेतकऱ्यांना द्यावा ज्यांनी शासन निर्णयाची अंमलबजावणी केली नाही,
त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत आणि सरकारने एक लिटरला पाच ते सात रुपये इतके अनुदान द्यावे. कारण सरकारच्या राहुरी कृषी विद्यापीठाने गाईच्या एक लिटरचा उत्पादन खर्च 42 ते 43 रुपये इतका दाखवला आहे. एक लिटरचा उत्पादन खर्च जर एवढा असेल तर 26, 27, 28 रुपये दर घेणाऱ्या शेतकऱ्यांनी दूध व्यवसाय कसा करायचा, असा सवाल प्रभाकर बांगर यांनी उपस्थित केला.